वैजापूर नगरपालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयाची प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडियासाठी निवड

पालिकेतर्फे शिक्षकांचा सत्कार

वैजापूर ,२५ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर नगर परिषद शिक्षण विभागातील मौलाना आझाद विद्यालयाची प्रधानमंत्री स्कूल फाॅर रायझिंग इंडियासाठी ( PM- SHRI ) निवड करण्यात आलेली असून ही एक नगर परिषद वैजापूर साठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यामुळे जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षणाची सोय या विद्यालयात शिक्षण घेण्या-या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

या यशाबद्दल वैजापूर नगरपालिकेच्या अध्यक्षा शिल्पाताई दिनेशसिंह परदेशी, ज्येष्ठ नगरसेवक श्री.निलेश भाटिया, नगरसेविका डाॅ.प्रिती भोपळे, मुख्याधिकारी भागवत बिघोत, व्यापारी संघटनेचे प्रकाश बोथरा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेन्द्र पाटील साळुंके यांच्या उपस्थितीत पालिकेच्या फुले-आंबेडकर सभागृहात शाळेचे मुख्याध्यापक जी.जी.राजपूत व सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच माझी वसुंधरा अभियानांतर्गत व नगर विकास दिनानिमित्त पालिकेच्या 19 शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विविध उपक्रम राबवून माझी वसुंधरा अभियान यशस्वी केल्याबद्दल या शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक, शिक्षक यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

नगर विकास दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल श्री.स्वामी समर्थ विद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे राजेंद्र पाटील साळुंके व मुख्याध्यापक राजेश वसावे व सर्व शिक्षक, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश बोथरा, सहशिक्षक बाबासाहेब कुमावत व सर्व शिक्षक तसेच नगर परिषद प्राथमिक शाळा वाणी वस्ती या शाळेतील मुख्याध्यापक अंतेश्वर शिंदे यांनी चालू शैक्षणिक वर्षांत विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी 100 % पालक संपर्क ठेवून गुणवत्ता वाढीसाठी प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच डाॅ. सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक परिक्षा सन – 2022-23 मौलाना आझाद विद्यालयातील 100 % विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षिका राजश्री बंड यांचाही यथोचित सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.

मागील दहा वर्षांत ज्या प्रमाणे विद्यार्थी वाढीबरोबरच नगर परिषदेच्या विविध उपक्रमात व अभियानात सहभाग नोंदवून सहकार्य केले असेच सहकार्य या पुढेही कराल अशी अपेक्षा नगराध्यक्षा शिल्पाताई  परदेशी यांनी सर्व शिक्षकांना संबोधित करतांना केली. शिक्षकांनी किमान पाच बिया लावून त्यांची रोपे तयार करावीत व प्रत्येक विद्यार्थ्याने एक बी लावून त्याचे रोपे तयार करून ती रोपे माहे – जून महिन्यात लावून त्यांचे संगोपन करण्याची संकल्पना पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी मांडली. जून महिन्यात नारंगी- सारंगी नदीचे सुशोभीकरण करण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतलेले असून नदीच्या काठावर दुतर्फा झाडे लावून माझ्या वसुंधरेच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करावेत अशी अपेक्षा मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.कार्यक्रमाची प्रस्तावना  पर्यवेक्षक मनिष गणवीर यांनी केली. 

या कार्यक्रमास नगरपालिका शाळातील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालिकेचे वाल्मीक शेटे पाटील,  त्रिभुवन, साळुंके, शुभम जोशी या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.