आयोजकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

नवी मुंबई,१७ एप्रिल / प्रतिनिधी :- खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात घडलेली घटना ही दुर्दैवी असून या घटनेला सर्वस्वी सांस्कृतिक विभाग जबाबदार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. या घटनेला जबाबदार असलेल्या सांस्कृतिक खात्याच्या आयोजकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

   विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामोठे येथील एम.जी. एम व खारघर येथील टाटा रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे बाधित श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. सांस्कृतिक विभागाचे मंत्री यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली. 

   या घटनेत १२ जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र बरेच जण बोलतायत आकडा लपवलं जातोय, त्यामुळे सरकारने व रुग्णालयाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे असे दानवे म्हणाले.

 राजकीय मंडळींनी स्वत:च्या निवाऱ्याची काळजी घेतली मात्र लाखो श्री सेवकांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले, त्यांची कोणतीही नीट व्यवस्था केली गेली नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप दानवे यांनी केला.

   सरकार मध्ये नियोजन करण्यास दम नव्हता तर मैदानात कार्यक्रम का केला असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला.  भक्तांचे राजकीय भांडवलीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी करत सरकारने केलेल्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले.