संत, महंत, वारकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या राज्यव्यापी आंदोलनाला मोठा प्रतिसाद
साईबाबांच्या दर्शनाला गेलेल्या साधूसंतांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध

मुंबई, 13 ऑक्टोबर 2020

संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यास त्वरीत परवानगी द्यावी. संत, महंत, वारकरी संप्रदायातील मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने घुसण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी दिला.

राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी शिर्डी येथे लाक्षणिक उपोषण करणाऱ्या संत- महंतांची , कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी पाटील शिर्डी येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरात शेकडो ठिकाणी मंदिराबाहेर आंदोलन करण्यात आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , राष्ट्रीय प्रवक्त्या खा. हीना गावीत , प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार  यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी , लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   

Image

   धार्मिक स्थळे आणि मंदिरांचे दार उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले

पाटील म्हणाले की,  कोरोना च्या प्रसारामुळे अनेक महिने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र हळूहळू सर्व व्यवहार सुरु होत आहेत.   वारकरी , संत महंत मंडळी क्षमाशील आहेत. आषाढी यात्रेची हजारो वर्षांची परंपरा यावर्षी खंडीत करण्यासही वारकरी संप्रदायाने परवानगी दिली . मात्र सर्व व्यवहार सुरु होत असताना मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याचा आघाडी सरकारचा निर्णय अनाकलनीय आहे.              

शिर्डी येथे श्री साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करुन राज्यव्यापी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली निर्वाणी आखाड्याचे महंत सुधिरदास महाराज, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, सुदर्शन महाराज महानुभाव, भाऊ महाराज फुरसुंगीकर, संजयनाना महाराज धोंडगे, आचार्य जिनेंद्र जैन, कैलास महाराज देशमुख, रितेश पटेल, बबनराव मुठे आदिंसह अन्य साधु-संत-वारकरी उपोषणात सहभागी झाले होते .      

आचार्य तुषार भोसले म्हणाले की , केंद्र सरकारने मागील महिन्यात लॉकडाऊन शिथील करताना मंदिरे उघडण्यासही परवानगी दिली आहे. मात्र महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास अजून परवानगी दिली नाही. एकीकडे बार सुरु करण्यास परवानगी दिली जाते आहे . मात्र मंदिरे उघडण्यास परवानगी नाकारली जाते आहे. वारकरी संघटनांचे प्रतिनिधी , संत , महंत मंडळींनी गेल्या महिन्यात राज्यात शेकडो मंदिरांत घंटानाद करून मंदिरे उघडण्याची विनंती केली होती. मात्र मुक्या , बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारने आमची विनंती ऐकलेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व प्रेम बेगडी आहे , हेच यातून दिसते आहे. 

मुंबईत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरासमोर  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

भाजपातर्फे आपण राज्य सरकारचा निषेध

शिर्डीच्या साईबाबांकडे गाऱ्हाणे मांडण्यास गेलेल्या साधूसंतांना अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यात मोगलाई अवतरल्याचे दाखवून दिले असून हिंदू भाविकांवर दादागिरी करणाऱ्या या कृतीचा आपण भारतीय जनता पार्टीतर्फे तीव्र निषेध करतो. हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खरे रूप या प्रसंगातून महाराष्ट्राला दिसले आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी सांगितले.

ते म्हणाले की, मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीसाठी मंगळवारी भाविकांनी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले. शिर्डी येथे साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून झालेल्या सत्याग्रहात आपण स्वतः सहभागी झालो होतो. लाक्षणिक उपोषणानंतर साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी साधू संत मंदिरात जाणार होते. त्यासाठी सकाळी दहा वाजताच शिर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निर्णय झाला नसल्याने वाट पाहून सर्वजण अध्यात्मिक समन्वय आघाडीचे समन्वयक आचार्य तुषार भोसले यांच्यासह मंदिराच्या गेटपर्यंत गेले. तेथे त्यांना पोलिसांनी अडवले. दीडतास चर्चेचा घोळ चालू होता. अखेरीस शिर्डीचे संस्थानचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी बाहेर आले व त्यांनी साधू संतांना सांगितले की, आपले शासनाशी बोलणे झाले असून दर्शनाची परवानगी देऊ शकत नाही व हा निर्णय अंतिम आहे. यानंतर पोलिसांनी थेट साधूसंतांना अटक केली. निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, भाऊमहाराज फुरसुंगीकर, धर्माचार्य विभागप्रमुख, आचार्य जिनेंद्र जैन, सतपंथाचे रितेश पटेल यांच्यासह अन्य साधूसंत व किर्तनकार यांना अटक केली. साईबाबांच्या दर्शनासाठी शांततेने विनंती करणाऱ्या साधूसंतांना सरकारने परवानगी तर दिलीच नाही उलट त्यांना अटक केली. राज्यात मोगलाई अवतरल्याचेच हे लक्षण आहे.

त्यांनी सांगितले की, राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात साधू संतांवर हल्ले होण्याच्या निंदनीय घटना घडल्या आहेत. पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने जमावाने साधूंना ठेचून मारले. नांदेडमध्ये ब्रह्मचारी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या करण्यात आली. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचे भूमीपूजन झाले म्हणून आनंद व्यक्त करणाऱ्या रामभक्तांवर ठाकरे सरकारने कारवाई केली. आता साईबाबांचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या साधूसंतांना अटक करून या सरकारने आपले खरे रंग दाखविले आहेत. भाजपातर्फे आपण राज्य सरकारचा निषेध करतो.