‘…त्यानंतरच राहुल गांधी उद्धव ठाकरेंना मुंबईत भेटणार’,काँग्रेसने स्पष्टच सांगितलं!

मुंबई,१७ एप्रिल / प्रतिनिधी :-   महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंपाचे संकेत दिले जात असतानाच तिकडे मातोश्रीवरही वेगवान घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. केसी वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.

केसी वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, चरणसिंग सप्रा उपस्थित आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते.

‘उद्धव ठाकरे हे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत आणि या लढाईत काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हाच निरोप घेऊन मी इथे आलो आहे. उद्धवजी दिल्लीत येऊन राहुल आणि सोनिया गांधींना भेटल्यानंतर नक्कीच राहुल गांधी देखील मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंना भेटतील’, असं केसी वेणुगोपाल या भेटीनंतर म्हणाले आहेत. तर देशात मीकरण विरुद्ध समीकरणाची लढाई सुरू असून ही लढाई लढण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आलो आहोत. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

काहीच दिवसांपूर्वी राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं बोललं जात होतं. पण आता काँग्रेसकडून याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे दिल्लीला येऊन राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतील, त्यानंतर राहुल गांधी मुंबईत येऊन ठाकरेंची भेट घेतील, असं केसी वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, यानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.