आप्पासाहेबांनी लाखो लोकांना समाजासाठी आणि इतरांसाठी काम करण्याची शिकवण दिली-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

नवी मुंबई  ,१६  एप्रिल / प्रतिनिधी :-  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी  डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना  वर्ष 2022 साठीचा  ‘महाराष्ट्र भूषण’  पुरस्कार आज रायगड येथे प्रदान केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्धीची कुठलीही आकांक्षा न बाळगता  सार्वजनिक जीवनात समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या  अप्पासाहेबांबद्दल जनतेच्या मनात अपार आदर आणि भक्ती आहे, असे गौरवोद्गार अमित शाह यांनी यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केले. अशाप्रकारे  अप्पासाहेबांसारखा आदर आणि भक्ती त्याग, समर्पण आणि सेवेतूनच प्राप्त होऊ  शकते, असे ते म्हणाले. लोकांचे अप्पासाहेबांवर असलेले प्रेम, विश्वास आणि आदर ही त्यांनी केलेले कार्य, त्यांचे संस्कार  आणि नानासाहेबांच्या शिकवणुकीचा सन्मान आहे. गर्दीच्या प्रवाहात वाहून जाण्याऐवजी लोक आपले अनुकरण करतील,असे अप्पासाहेबांसारखे कार्य करायला हवे, असे शाह यांनी सांगितले.

एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांमध्ये समाजसेवेचे संस्कार असल्याचे इतिहासात क्वचितच पाहायला मिळते, असे अमित शाह म्हणाले.  आधी नानासाहेब, मग अप्पासाहेब आणि आता सचिनभाऊ व त्यांचे बंधू ही समाजसेवेची परंपरा पुढे नेत आहेत. महाराष्ट्र सरकारने अप्पासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यासोबतच कोट्यवधी लोकांना त्यांच्यासारखे जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन शाह यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रातील रायगडमधील ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांची  पुण्यभूमी आहे असे अमित शाह म्हणाले. या भूमीने देशात तीन प्रवाह निरंतर सुरु ठेवले आहेत. एक – राष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याचा शौर्याचा प्रवाह ज्याची सुरुवात वीर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. देशभरात  महाराष्ट्राच्या भूमीतील महान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर, वासुदेव बळवंत  फडके, चापेकर बंधू आणि  लोकमान्य बाळ  गंगाधर टिळक यांच्यासारख्या  महान विभूतींनी स्वराज्य आणि सन्मानासाठी आपले जीवन समर्पित केले.

भक्तीचा प्रवाह ज्यात भक्तीच्या  क्षेत्रात  संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांच्यापासून ते  संत नामदेव यांच्यापर्यंत अनेक  महान संतांनी नेहमीच या देशाला मार्ग दाखवण्याचे काम केले आहे. तीन – सामाजिक चेतनेचा प्रवाह  ज्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यासारखे अनेक सामाजिक आंदोलनाचे जनक महाराष्ट्राच्या या महान भूमीतच जन्माला आले. हाच वारसा पुढे नेत नानासाहेब आणि अप्पासाहेब यांनी सामाजिक चेतना जागवण्याचे आणि ते कार्य पुढे नेण्याचे भगीरथ कार्य केले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार  मंत्री म्हणाले की आपल्या उपनिषदांमध्ये सांगितलेली  “सर्वे भवंतु सुखिनः, सर्वे संतु निरामया” ही भावना प्रत्यक्षात अंमलात आणणे खूप  कठीण आहे. ते म्हणाले की या भावनेमध्ये व्यक्तीला सामाजिक जीवनाचा मोठा काळ  त्याच्या कृतीतून स्वत:साठी नाही तर समाजासाठी आणि इतरांसाठी जगायची शिकवण देण्यात आली आहे. वाणीतून किंवा शब्दांतून  दिलेला धडा हा अल्पायुषी असतो जो कालांतराने विसरला जातो , मात्र आपल्या कृतीतून दिलेला धडा चिरंतन राहतो.  शाह म्हणाले की अप्पासाहेबांनी लाखो-कोट्यवधी लोकांना समाज आणि इतरांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. अप्पासाहेबांनी देशाला जेव्हा सर्वाधिक गरज होती तेव्हा सर्वे भवन्तु सुखिनः या मंत्राच्या आधारे दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या लाखो लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे  काम  केले आहे, त्यांच्या याच कार्यामुळे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील  सरकारने आप्पासाहेबांना  पद्म पुरस्कार देऊन गौरवले.

राज्यात वर्ष 1995 पासून महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची सुरुवात झाली आणि महाराष्ट्र आणि देशातल्या सामाजिक जीवनात योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, असे अमित शाह म्हणाले.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्यापासून हे पुरस्कार द्यायला सुरुवात झाली त्यानंतर गानकोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले, शास्त्रज्ञ विजय भटकर, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुप्रसिद्ध कलाकार सुलोचना जी आणि नानासाहेब यांच्यानंतर त्यांच्याच परिवारात दुसऱ्यांदा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आप्पासाहेब यांना मिळत आहे, असं शाह यांनी सांगितलं. एकाच कुटुंबातल्या व्यक्तीला दुसऱ्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जात आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे, असेहि गृहमंत्री शाह म्हणाले.  आप्पासाहेब यांनी “लेट्स मार्च ऑन” (“Let’s March On”) अशी घोषणा करत आपल्या कार्यातून समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले.

त्यांनी मुलांच्या संगोपनात सुधारणा, शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान शिबिर, सण-उत्सव काळात कचरा संकलनाची, स्वच्छता मोहिमेची अभिनव सुरुवात, जलसंवर्धन,विहिरींची स्वच्छता, महिला सक्षमीकरण,  आदिवासी कल्याण, व्यसनमुक्त समाज, अंधविश्वास आणि अज्ञानता यांचे निर्मूलन करण्यासारखे खूप साऱ्या क्षेत्रात आपल्या कार्यातून एक उदाहरण घालून दिले आहे.

अमित शहा यांनी आप्पासाहेब यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना सोबत अनेक वर्षापर्यंत असेच काम करत राहावे अशी इच्छा  व्यक्त केली.  आप्पासाहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.