पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला इकॉनॉमिक टाइम्स ‘कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्’ सोहळा

मुंबई,२८  एप्रिल / प्रतिनिधी :-राज्यात सध्या बुलेट ट्रेन, शिवडी न्हावाशेवा सी-लिंक, कोस्टल रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक अशी अनेक पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईत येत्या काही वर्षात मेट्रो मार्ग तयार होत असून देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे सांगत उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये इकॉनॉमिक टाइम्सच्या वतीने ‘कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुखलाल मांडवीय, जी २० चे मुख्य शेर्पा अमिताभ कांत, बेनेट अँड कोलमन कंपनीचे संचालक विनीत जैन, इकॉनॉमिक टाईम्सचे मुख्य संपादक बोधिसत्व गांगुली, केंद्रीय वित्तसचिव टी. व्ही. सोमनाथन, यांच्यासह उद्योगपती, उद्योजक आणि उद्योग समूहांचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डस् च्या माध्यमातून इकॉनॉमिक टाइम्सने उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पायाभूत सुविधांचे जाळे मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर असल्याने उद्योजकांचे महाराष्ट्र हे आवडते डेस्टीनेशन आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या विकास कामांना आम्ही गती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अनेक विकास कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

गेल्या अडीच वर्षांत रखडलेली विकास कामे पुन्हा गतिमानपणे सुरू झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले, असे सांगत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्याच्या विकासाला निश्चित दिशा देण्यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्रा’ची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ५ ट्रीलियन डॉलर्स इकॉनॉमी बनवण्याचे स्वप्न पाहिले असून त्यात महाराष्ट्रने १ ट्रिलियन डॉलर्सची भर टाकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी राज्यातील उद्योजकांची साथ आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता राज्यात असून त्यामुळे या राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. यावेळी राज्याला उद्योग क्षेत्रात नवीन उंची मिळवून देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या सोहळ्यात पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.