समृद्धी महामार्गाची उभारणी करताना उद्योगांचे टापू निर्माण करून राज्यभर समृद्धी आणावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा

मुंबई, दि.9 : राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आहे. राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्या भागातच सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोनाच्या निमित्ताने एक बाब लक्षात आली ती म्हणजे ज्या भागात उद्योगाचा पट्टा आहे तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. याच पट्ट्यात लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्गाची उभारणी करताना ही बाब लक्षात घेऊन उद्योग निहाय टापू करावेत. दळणवळणाची सुविधा करतानाच या उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सुविधा त्याच भागात देता येतील अशी व्यवस्था करावी.

भौगोलिक परिस्थितीनुसार उद्योगनिहाय टापू करतानाच त्या भागाचा विकास करतानाच समृद्धी महामार्गावर ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या महामार्गावर वेगवेगळे नोड करताना उद्योग, कृषी, पर्यटन यानुसार भौगोलिक परिस्थितीनुरूप नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. वस्त्रोद्योगाला अधिक चालना मिळण्यासाठी  प्रयत्न करावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी  दिले. २४ जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ७०१ कि.मी. लांबीच्या महामार्गासाठी ८३११.१५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गामुळे १० जिल्हे थेट जोडणार असून २४ जिल्ह्यांचे रस्ते जोडले जाणार आहेत. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. जेएनपीटी सारखे बंदर देखील जवळ येणार आहे. वेगवेगळ्या नोडमध्ये उद्योगांचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.मोपलवार यांनी सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *