स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लिडर’

नवी दिल्ली,दि. १२ : केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स) देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय राज्याला स्टार्टअप सुधारणांच्या श्रेणींमध्ये अन्य तीन स्थान मिळाली आहेत.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीवर आधारित निकालाची घोषणा (वर्ष 2019) व सत्कार समारंभ आज येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, राज्यमंत्री ओम प्रकाश आणि सचिव गुरु प्रसाद मोहपात्रा उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी हेही दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. सर्व सहभागी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  उपस्थित होते.

राज्यांच्या स्टार्टअप संस्थांसाठी ठरविण्यात आलेल्या विविध निकषांच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या निकालात एकूण पाच श्रेणींमध्ये 22 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांना क्रमवारी देण्यात आली. यात महाराष्ट्राला स्टार्टअप योजनेच्या नियोजनबद्ध व प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते, त्यांनी हा सन्मान स्वीकारला.

राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी व उद्दिष्ट्य ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. नाविण्यपूर्ण दृष्टीकोण व प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. याची विशेष दखल या निकालात घेण्यात आली. गेल्या चार वर्षात राज्यामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून 500 कोटींचा निधी उभारण्यात आला. स्टार्टअपसाठी पूरक वातावरण निर्मिती करत सिंगल पॉईंट काँटॅक्ट उभारण्यात आले.

यासोबतच स्टार्टअप सुधारणांमध्ये महाराष्ट्राने नवीन उद्योजक तयार करणे, नाविन्यपूर्ण विस्तार करणे तसेच जनजागृती आणि प्रसार या तीन वेगवेगळ्या निकषांवरही या निकालात उत्तम गुण अर्जित करून बाजी मारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *