महावितरणमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी

छत्रपती संभाजीनगर ,१४ एप्रिल / प्रतिनिधी :- महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, मशाल रॅली अशा विविध उपक्रमांनी डॉ.आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार होते. यावेळी उच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णू ढोबळे, शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे, ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड, कार्यकारी अभियंता सतीश खाकसे, प्रेमसिंग राजूपत, महेश पाटील, जयंत खिरकर, विश्वनाथ लहाने, सहायक अभियंता रूपाली पहूरकर, समितीचे सचिव सुनील बनसोड, कोषाध्यक्ष डॉ.कृष्णा काळदाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

         भीमजयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बालगटात राजेश्री शिंदे-प्रथम, रिया भवर-द्वितीय, परिणीती शिंदे -तृतीय तर मोठ्या गटात राजलक्ष्मी सूर्यवंशी- प्रथम व कृष्णा सूर्यवंशी-द्वितीय यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.गहिनीनाथ वळेकर यांनी केले.

भीमजयंतीनिमित्त सकाळी विद्यापीठातील बाबासाहेबांचा पुतळा ते मिलकॉर्नरवरील महावितरणच्या ‍परिमंडल कार्यालयापर्यंत ज्ञानज्योती मशाल यात्रा काढून वीजचोरीचे दुष्परिणाम, वीज बचत, वीजबिल भरण्याचे महत्त्व याबाबत महावितरणचे कर्मचारी संजय शाहीर, नारायण खरात, विशाल घायाळ, शशी सपकाळ, विनोद तित्तर, प्रेमचंद चव्हाण, विजय पवार, विनायक देवकर, विवेकानंद बांगर, कृष्णा काळदाते, तुळशीराम सपकाळ यांनी जनजागृती केली.

यावेळी प्रमुख वक्ते विष्णू ढोबळे म्हणाले की, डॉ.आंबेडकर हे दीनदलित, कामगार, शेतकरी,‍ महिलांना न्याय देणारे महापुरुष होते. त्यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे वाटचाल करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. अध्यक्षीय समारोप करताना मुख्य अभियंता सचिन तालेवार म्हणाले की, बाबासाहेबांनी भारतातील विद्युत क्षेत्राच्या विकासाची पायाभरणी केली. त्यांच्या विचारांनुसार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी कार्यरत असले पाहिजे. जयंती उत्सव समितीने यावर्षी राबवलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

प्रास्ताविक सुनील बनसोड यांनी केले. सहायक अभियंता रूपाली पहूरकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रावण कोळनूरकर यांनी वक्त्यांचा ‍परिचय करून दिला. डॉ.कृष्णा काळदाते यांनी आभार मानले. गजेंद्र पवार, अभय एरंडे, प्रशांत साळुंके, ज्योती तोडकर, सचिन चव्हाण, कमलाकर दांडगे, बाबूराव राठोड आदींनी स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन, महाराष्ट्र विद्युत अभियंता-अधिकारी-कामगार सेनेचे कार्याध्यक्ष शीलरत्न साळवे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे प्रादेशिक सचिव तुषार भोसले, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे प्रादेशिक सचिव अविनाश चव्हाण, वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी बी.एल. वानखेडे, पांडुरंग पठाडे, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे परिमंडल अध्यक्ष गौतम पगारे, महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेचे कार्याध्यक्ष नारायण खरात आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.