धर्मादाय आयुक्तालयातर्फे समाजकार्यात अग्रेसर मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन गौरव

नोंदणीकृत संस्था, मंदिर, न्यास त्यांचे विश्वस्त व समाजातील दानशुर अशा १२९​ बांधवांचा गौरव 

छत्रपती संभाजीनगर,२८ मार्च  / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा व विभागातील आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीकृत संस्था, मंदिर, न्यास व त्यांचे विश्वस्त, समाजातील दानशुर व्यक्तींच्या स्वत: अथवा संस्थेमार्फत केलेल्या सामाजिक उपक्रमांसाठी १२९​ बांधवांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

या सामाजिक उपक्रमात पूरग्रस्त निधी, कोविड महामारी, राष्ट्रीय लोक अदालतीत अन्नदान, मायेची चादर, सामुहीक विवाह सोहळा,  आरोग्यपत्र, सॅनिटरी नॅपकीन वितरण यंत्र इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. हा सन्मानपत्र वाटपाचा सोहळा मंगळवारी  शहरातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पार पडला. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान छत्रपती संभाजीनगरचे धर्मादाय सहआयुक्त ॲड. सुरेंद्र बियाणी यांनी भूषविले. यावेळी सहाय्यक धर्मदाय आयुक्त संतोष पवार, धर्मदाय संघटना सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष दयाराम बसैये, सरचिटणीस मनोज पदलादर, कोषाध्यक्ष राजू कुलकर्णी, उपाध्यक्ष शशांक टापरे, उपाध्यक्ष मिठू पाटील बरगळ, रमेशअण्णा मुळे, रामानंद महाराज, चिटणीस श्रीपाद कुलकर्णी, सहचिटणीस उत्तमराव मनसुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष दयाराम बसैये यांनी आम्ही सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या माध्यमातून काम करत आहोत. तसेच भविष्यात देखील धर्मादाय मदतीने काम करत राहणार असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात छत्रपती संभाजीनगरचे धर्मादाय सहआयुक्त ॲड. सुरेंद्र बियाणी यांनी उपस्थित सर्वच मान्यवरांचे सामाजिक कार्यात मिळणाऱ्या मदतीबद्दल व वेळोवेळी उपस्थितीबद्दल आभार मानले. तसेच समाज निरोगी करण्याच्या समाजभावनेतून अपंग मुलाला मेडिकल कार्ड वाटप करणार असून, अंध मुलांना आरोग्यपत्र देण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती दिली.

निरीक्षक आकाश वानखेडे व जनसंपर्क अधिकारी रंजित कायटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मनोज पडळकर यांनी आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अनेक मान्यवरांची व धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख निमंत्रक म्हणून धर्मादाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार-गंजेवार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त संतोष पवार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाकळे, दयाराम बसैये बंधू, मनोज पाडळकर, राजू कुलकर्णी, शशांक टापरे, मिठू पाटील बारगळ, रमेश मुळे, रामानंद महाजन, श्रीपाद कुलकर्णी, उत्तमराव मनसुटे यांनी काम पाहिले तर समिती सदस्य मध्ये निरीक्षक आकाश वानखडे, सुधीर दिवसे, दीप बागुल, जयसिंग मुसळे, ॲड.चंद्रकांत वरुडीकर, ॲड.श्रीकांत मिश्रा, ॲड.मनीषा दसपुते, ॲड.सदानंद देवे, ॲड.प्रमोद पवार, ॲड.आशा झोंड पाटील, महंत कृष्ण महाराज यांच्यातर्फे व्ही.एस.बोरुडे समिती सदस्य म्हणून सहकार्य केले. तसेच या सोहळ्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद, धर्मादाय सह आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर, धर्मादाय वकील संघ, संत जनार्दन स्वामी आश्रम जय बाबाजी भक्त परिवार वेरूळ यांच्यासह आदींनी अथक परिश्रम घेतले.