अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा

छत्रपती संभाजीनगर- हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता.प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्य गीतानंतर मुख्यमंत्र्यांनी  उपस्थितांना मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची प्रतिज्ञा दिली.

या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार  सय्यद इम्तियाज जलील, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विधान सभा सदस्य  आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त  जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माहिती जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व पुस्तकाचे प्रकाशन

आज सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय समारंभस्थळी माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

सिद्धार्थ उद्यानात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना, मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया आदी उपस्थित होते. या प्रदर्शनास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधिर मुनगंटीवार तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रधान सचिव विकास खारगे यांनी भेट दिली.

या प्रदर्शनात हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाशी निगडीत महत्त्वाची छायाचित्रे व महत्त्वाच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच डॉ. मंगला बोरकर यांनी तयार केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या रेखाचित्रांची मांडणीही प्रदर्शनात करण्यात आली आहे.
जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांनी संपादित केलेल्या ‘हैदराबाद मुक्ति संग्रामाची स्मृतिगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम,एक आकलन’ ही माहिती पुस्तिका, आणि स्मृतिदर्शिका 2023-24 चे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रदर्शनास नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनींनी , शासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी भेट दिली.