बांधकाम परवानगी व्यवस्थापन सहायता सेल स्थापन करणारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महाराष्ट्रात प्रथम

बी पी एम एस सेल मुळे वेळेची बचत होऊन बांधकाम परवानगी मिळणार

छत्रपती संभाजीनगर,१३  एप्रिल / प्रतिनिधी :-  नागरिकांना बांधकाम परवानगी प्रस्ताव हे नियमानुसार व परिपूर्ण दाखल करण्यास मदत करणे व वेळेची बचत होऊन जास्तीत जास्त बांधकाम परवानगी देणे बाबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे बी.पी.एम.एस सेल कक्ष स्थापन करण्यात आला आहे या बांधकाम परवानगी व्यवस्थापन सहायता कक्षाचे उदघाटन आज पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल,प्रशासक डॉ अभिजीत चौधरी,अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील,शहर अभियंता ए बी देशमुख,कार्यकारी अभियंता बी डी फड,आर एन संधा,उप संचालक नगर रचना  मनोज गर्जे ,उप अभियंता संजय कोंबडे,अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी टप्पा क्र ०३ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

राज्यातील सर्व नगरपालिका / महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांचेकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर एक संगणकीय कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने शासन नगर विकास विभागाचे निर्णय अन्वये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बांधकाम परवानगी प्रस्ताव हा बी. पी. एस. एस. कार्यप्रणाली ( Building Plan Management System) द्वारेच सादर करण्याचे निर्देश आहेत.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यरत क्रेडाई असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन व इंजिनिअर असोसिएशन तसेच परवानाधारक खाजगीरित्या सदरच्या प्रणाली अंतर्गत बांधकाम परवानगी दाखल करते वेळी येणाऱ्या अडचणी बाबत तक्रार / सुचना केल्या होत्या. त्यानुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे या बाबत धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या बी.पी.एम.एस.सेलची स्थापना केली आहे. सदर सेलमुळे दाखल होणारे बांधकाम परवानगी प्रस्ताव हे नियमानुसार व परिपुर्ण दाखल करण्यास मदत होईल व त्यामुळे वेळेची बचत होऊन जास्तीत जास्त बांधकाम परवानगी निर्गमित होतील.

सदरचा बी. पी. एम. एस. सेल स्थापन करणारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील प्रथम महानगरपालिका आहे. ज्यांनी अशा प्रकारे नागरिकांच्या सोईसाठी असा सेल स्थापन करुन त्यांना ही सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. सदरच्या सेलचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.