फुले आंबेडकरांचे विश्वात्मक मानवतेचे मूल्य स्वीकारण्याची गरज- ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस

‘स्वारातीम’ विद्यापीठात फुले-आंबेडकर जयंती उत्सवास प्रारंभ

नांदेड ,१२ एप्रिल/ प्रतिनिधी :- जातीयवादामुळे आपली सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मता दुभंगली आहे. जात ही मानसिकता आहे. उच्चवर्णीय असो वा कनिष्ठ जातीचे ते जातीपासून मुक्त नाहीत. देश एकसंघ राखण्यासाठी फुले-आंबेडकरांच्या विश्वात्मक मानवतेचे मानदंड ठरलेल्या मूल्यांचा स्वीकार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव ‘संविधान-२०२३’ च्या उद्घाटन सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल, जयंती संयोजक समिती प्रमुख सचिन पवळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी जयंतीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक केले. पुढे ते म्हणाले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श विद्यार्थी होते. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अठरा तास अभ्यास हा उपक्रम म्हणजे त्यांना खरेखुरे अभिवादन ठरेल.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले.

यावेळी उपकुलसचिव डॉ. रवी एन. सरोदे, डॉ. पंडित सोनाळे, डॉ. अविनाश कदम, डॉ. सुहास पाठक, डॉ. वसंत वाघ, डॉ. राजपालसिंह चिखलीकर, काळबा हनवते, डॉ. हर्षवर्धन दवणे, डॉ. संदीप जाधव, संदीप एडके, जालिंदर गायकवाड, डॉ. प्रशांत घोडवाडीकर, आदिनाथ डोपेवाड, डॉ. प्रवीणकुमार सावंत, साहेबराव गजभारे, डॉ. रवि सुर्यवंशी, प्रदीप बिडला,  शेख रशीद यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.