संजय बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी खासदार चिखलीकर यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट

नांदेड ,७ एप्रिल  /प्रतिनिधी :- येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा तपास केंद्रीय उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करून संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारास तात्काळ अटक करावी या मागणीसाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन दिले. माहेश्वरी समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्यक्ष भेटून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयात देण्यात आले आहे. 

नांदेड शहराच्या विकासात आणि वैभवात भर घालणारा एक उत्तम बांधकाम उद्योजक माहेश्‍वरी समाजातील  तरुण समाजसेवक यासोबतच समाजशील व्यक्तिमत्व म्हणून संजय बियाणी यांची ख्याती होती. अल्पावधीत त्यानी बांधकाम क्षेत्रात घेतलेली भरारी अतुलनीय होती.  सामाजिक क्षेत्रातले त्यांचे काम तितकेच मोठे होते. माहेश्‍वरी समाजातील गोरगरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी विशेष योजना राबवत अल्पदरामध्ये घरे दिली होती.  त्यामुळे संजय बियाणी यांचे सामाजिक आणि बांधकाम या क्षेत्रातील योगदान अतुलनीय होते. मात्र दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी अज्ञात मारेकर्‍यांनी बियाणी यांच्या घरासमोर त्यांना गोळ्या झाडून हात्या केली. या हत्येला दोन दिवसाचा कालावधी लोटला असला तरी नांदेड पोलिसांना कोणतेही धागेदोरे सापडले नाहीत. नांदेड पोलिसांकडून योग्य दिशेने तपास होत नसल्याचेही चर्चिले जात आहे . याच पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तातडीने दिल्ली गाटत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या हत्याकांडाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत करावा, बियाणी कुटुंबीयांना न्याय द्यावा ,मारेकऱ्यांना आणि त्याच्या सूत्रधारास तात्काळ अटक करावी अशी मागणी केली.

याचवेळी महेश्वरी समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले होते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माहेश्वरी समाजाच्या मागण्याचे ते निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयात दिले तर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून दिले आहे. त्यामुळे आता संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून झाल्यास निश्चितपणे तातडीने धागेदोरे हाती लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.