गोदावरी नदीवरील पुलाचे रखडलेले काम पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेणार ; नागमठाण येथील तरुणांचा इशारा

वैजापूर ,१ एप्रिल  / प्रतिनिधी :- मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या नागमठाण (ता. वैजापूर) येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम गेल्या तेरा वर्षांपासुन रखडले आहे. त्यामुळे या कामाचा खर्च सहा कोटींवरुन बारा कोटी रुपयांवर गेला आहे. हे काम येत्या पाच एप्रिल पर्यंत सुरु न झाल्यास सहा एप्रिल रोजी गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करु असा इशारा तेथील तरुणांनी दिला आहे. यापुर्वी गेल्या वर्षी ९ फेब्रुवारी रोजी त्यांनी याच कारणासाठी आंदोलन केले होते.

वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचे १९८० मध्ये सर्वेक्षण झाले होते व २००९ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यानंतर काही कारणास्तव हे काम बंद पडले व २०१९ ला काम सुरु करण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा हे काम बंद पडले. यासंदर्भात संबंधित अधिकारी व कंत्राटदार हे वारंवार विचारणा करुनही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने गणेश तांबे, प्रवीण चव्हाण, मोहन दिवटे, पवन चव्हाण, सुभाष खुरुद, प्रशांत चव्हाण, गणेश ठोंबरे, घनश्याम चव्हाण, मनोज वीरकर, ज्ञानेश्वर बर्डे, डॉ.‌गोकुळ चामे, महेंद्र बोधक, भगवान काळे, सुनिल काळे, राजेंद्र खुरुद, बाबासाहेब शेळके, सुदाम कुरकुटे, अभिषेक बोर्डे, ज्ञानेश्वर काळे आदी तरुणांनी जलसमाधी आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. 

मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागमठाण भागातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने ते संतप्त झाले आहेत. सहा एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा इशारा विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला असुन हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठवण्यात आले आहे. २००९ पासुन रखडलेल्या या कामाची किंमत वाढण्यास कोण कारणीभुत आहे याची खातेनिहाय चौकशी करावी व भुसंपादन प्रकरणात बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एस.बी. काकड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.