प्रेमाच्या ओढीपोटीच सचिनचा घात ; प्रेयसीच्या वडील,काका व आजोबाला पोलिस कोठडी


वैजापूर ,​२ मार्च / प्रतिनिधी :-प्रेमाला उपमा नाही, हे देवा घरचे गाणे असे प्रेमाच्या बाबतीत म्हंटले जात असले तरी कधी कधी या प्रेमाच्या ओढीपोटीच एखाद्याला जीवाला मुकावे लागते याचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील भिवगाव शिवारात मंगळवारी उघडकीस आला. सचिन प्रभाकर काळे (16 वर्ष) या दहावीच्या वर्गातील मुलाच्या खुनाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सचिन त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला आणि याची कुणकुण लागताच तिचे वडील, काका व आजोबा या तिघांनी त्याचा खुन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दादासाहेब माधवराव जंगले (42), सुनिल माधवराव जंगले (44) व माधवराव कारभारी जंगले (71) या तिघांना वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.‌ 

वैजापूर तालुक्यातील बोरसर येथील रहिवासी असलेला सचिन तीन बहिणींनंतर घरातील सर्वात लहान मुलगा.‌ विनायकनगर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत असतांना शाळेतील एका मुलीशी त्याचे प्रेम संबंध जुळले.‌ अजाणत्या वयातच प्रेमाच्या आणाभाका दिल्या. सचिनने तिला प्रेमापोटी एक मोबाईल भेट दिला.‌ मोबाईलच्या माध्यमातून दोघांमध्ये संवाद वाढत गेला व प्रेम बहरत गेले.‌ पण हे प्रेमच आपल्या मृत्युस कारणीभुत ठरेल याची यत्किंचितही जाण नसलेल्या सचिनने 24 फेब्रुवारीच्या रात्री सखीकडे जाण्याचा बेत रचला व त्यात तो यशस्वीही झाला.‌ रात्रीच्या वेळी आलेल्या सचिनला तिने घरात घेतले पण याची कुणकुण आजोबा माधव जंगले यांना लागली. त्यांनी याबाबत ताबडतोब आपली दोन मुले दादासाहेब व सुनिल यांना सांगताच दोघेही प्रेमी युगुलाच्या पुढ्यात आले. आपल्या मुलीसाठी मुलाने रात्रीच्या वेळी घरात येण्याचे धाडस दाखवल्याचा राग तिघांच्याही डोक्यात होता. त्यांना कुठलाही विचार न करता केवळ सोळा वर्षांच्या मुलास मुली देखत बेदम मारले.‌ प्रचंड रक्तस्त्राव होऊन बेशुद्ध झालेला सचिन जागेवरच गतप्राण झाला.‌ त्या तिघांनी सचिनचा मृतदेह घरापासुन केवळ अर्धा कि.मी.अंतरावर असलेल्या भिवगाव शिवारातील गायके यांच्या शेतात फेकला.‌

24 फेब्रुवारी रोजी ही घटना घडल्यानंतर सचिन घरी नसल्याचे पाहुन त्याच्या वडीलांनी दुसऱ्या दिवशी (25 फेब्रुवारी) वैजापूर पोलिस ठाण्यात सचिनच्या अपहरणाची फिर्याद दिली. तेव्हापासुन स्थानिक पोलिस सचिनचा शोध घेत होते. पण 28 फेब्रुवारी रोजी पोलिस पाटील गोरख शिरसाठ यांनी भिवगाव शिवारातुन उग्र दर्प येत असल्याची माहिती कळवल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, मोईस बेग, राम कवडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी मृतांची ओळख पटली.‌ घटनास्थळाच्या परिसरात पोलिसांना सचिनचा बुट, हेडफोन आढळून आला.‌ ज्युली या श्वानाने महत्वाची भुमिका बजावत आरोपींचा माग काढला. 

असे पकडले आरोपी

घटना घडल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील हे पथकासह चौकशी करण्यासाठी जंगले यांच्या घरी गेले त्यावेळी माधवराव जंगले हा घरात होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर माधवराव याने त्याची दोन मुले दादासाहेब व सुनिल हे दोघे जेजुरीला गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला फोनवर संपर्क करण्यास सांगितले. तेव्हा माधवराव म्हणाला मी खेडुत आहे. मला मोबाईल समजत नाही. मात्र याच वेळी त्याच्या खिशातील मोबाईल वाजला. आता मात्र पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवताच माधवराव पोपटासारखा बोलू लागला.‌ सचिनचा खुन आम्हीच केला असून याप्रकरणात अटक होऊन नये म्हणुन दादासाहेब व सुनिल हे दोघे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी वैजापुरला गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.‌ पोलिसांनी माधवराव व नंतर त्याच्या दोन मुलांना वैजापूर येथे हॉटेलमधून अटक केली.