वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणात सोडण्यात आलेले पालखेडचे पाणी बंद

वैजापूर,१ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिक जिल्हयात पावसाने विश्रांती घेतल्याने नाशिक जिल्हयातील धरणांतून पाण्याचा विसर्ग घटविण्यात आला आहे. पालखेड धरणांतून डाव्या कालव्याद्वारे वैजापूर शहरासाठी नारंगी धरणात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे. पंधरा दिवसानंतर पालखेडची दारे बंद करण्यात आली सध्या नारंगी धरणात केवळ 12.74 टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.नारंगी न भरल्यास वैजापूर शहराचा पाणीप्रश्न बिकट होणार आहे.
नाशिक जिल्हयातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मंदावल्याने पाणी विसर्गात मोठी कपात करण्यात आली आहे तर पालखेड धरणात 53.31 टक्के पाणीसाठा असून विसर्ग थांबविण्यात आलेला आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यामधून गोदावरी पत्रात 1614 क्यूसेस विसर्ग सुरू आहे. वैजापूर तालुक्यातही सध्या पावसाने उघडीप दिली असून तालुक्यातील जलसाठयांमध्ये आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही.

वैजापूर तालुक्यात एकूण नऊ प्रकल्प असून या प्रकल्पात असलेला सध्याचा पाणीसाठा असा आहे.

नारंगी मध्यम प्रकल्प  – 12.74 टक्के 

बोर दहेगाव मध्यम प्रकल्प -24.93 टक्के

कोल्ही मध्यम प्रकल्प – 20.54 टक्के

बिलवणी लघुतलाव – जोत्याच्या पातळीखाली

खंडाळा लघुतलाव   – जोत्याच्या पातळीखाली

जरुळ लघुतलाव       – जोत्याच्या पातळीखाली 
सटाणा लघुतलाव     – 13.73 टक्के 
गाढेपिंपळगांव लघुतलाव – 08.52 टक्के 

मन्याड साठवण तलाव     – 26.33 टक्के