नवे भारतीय चित्रपट निर्माते त्यांच्या कथांसह जगाला आकर्षित करण्यासाठी सज्ज – अनुराग ठाकूर

ऑस्कर पुरस्कारप्राप्त एलिफंट व्हिस्परर्सच्या चमूची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली भेट

नवी दिल्ली,​३०​ मार्च / प्रतिनिधी:- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज त्यांच्या निवासस्थानी ऑस्कर पुरस्कारप्राप्त माहितीपट, ‘एलिफंट व्हिस्परर्स’च्या चमूची  भेट घेतली. ठाकूर यांनी यावेळी दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर कार्तिकी गोन्साल्विस, , निर्मात्या गुनीत मोंगा  आणि नेटफ्लिक्सच्या मोनिका यांची भेट घेतली.

माहितीपटाच्या चमूशी संवाद साधताना , भारताची कथाकथनाची ताकद अतुलनीय आहे!. असे सांगत अशाच प्रकारच्या एका कथेने ऑस्कर जिंकल्याबद्दल ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. “एलिफंट व्हिस्परर्स हा माहितीपट  हृदयस्पर्शी, प्रासंगिक आणि छायाचित्रिकरणाच्या दृष्टीने  मंत्रमुग्ध करणाऱ्या उत्कृष्ट कलाकृतींनी भरलेला ‘खजिना’  आहे!  गुनीत आणि कार्तिकी यांना भेटून आणि हा मंत्रमुग्ध करणारा माहितीपट तयार करतानाच्या त्यांच्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल जाणून घेताना मला आनंद झाला आहे.”, असे ठाकूर म्हणाले.

या माहितीपटामध्ये  आपले सामाजिक उत्तरदायित्व, , परिणाम आणि संवर्धनाच्या प्रयत्नांसह मानव आणि निसर्ग यांच्यातील नाजूक संतुलनाचे अत्यंत सुंदर चित्रण करण्यात आले असून हे अतिशय हृदयस्पर्शी आणि खऱ्या अर्थाने प्रशंसनीय आहे, असे ते म्हणाले.   भारत ही कथाकारांची भूमी आहे, लाखो कथा दररोज जन्म घेतात आणि काही कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात , असे अनुराग ठाकूर यांनी भारतातील कथाकथन परंपरा सखोल जाणून घेतल्यांनंतर सांगितले.

चित्रपटांमधील दर्जेदार स्थानिक आशयावर  भर देत, केंद्रीय मंत्री म्हणाले की आपल्या चित्रपटांचे स्थानिक चित्रण आणि आशय जागतिक स्तरावर पोहोचला असून जगातील विविध भागांमध्ये ते प्रादेशिक भाषेत रुपांतरीत होत आहे आणि त्याचा आनंद घेतला जात आहे. भारतामध्ये कथांचा अमूल्य स्त्रोत आहे, आणि नवीन चित्रपटकर्मी ते टिपून घेण्यासाठी धडपडत आहेत! 
भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आपल्या चित्रपट निर्मात्यांना मिळालेले यश आणि ओळख त्यांना आपल्या समाजातील या सुंदर कथा सांगण्यासाठी, आणि सिनेमाच्या माध्यमातून त्या सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी आणखी प्रोत्साहन देत आहे.” 

यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी एकूणच चित्रपट सृष्टीला संबोधित केले.  चित्रपटांची सह-निर्मिती, निधी पुरवणे, चित्रपटांचे प्रीमियर आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये स्क्रीनिंग द्वारे, आणि मास्टरक्लासद्वारे भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आश्वासन देत, चित्रपट निर्मात्यांना पाठींबा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

माहितीपटातील वन्यजीव संवर्धकांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले,“तामीळनाडू इथे गेल्यावर बोमन आणि बेली यांना नक्की भेटता येईल, अशी मला आशा आहे. त्यांचे जीवन आणि हत्ती संवर्धनाचे प्रयत्न उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहेत.” 

एलिफंट व्हिस्परर्स या चित्रपटाने अलीकडे 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला आहे. हा चित्रपट, एका हत्तीच्या अनाथ पिल्लाची काळजी घेणाऱ्या, बोमन आणि बेली या वयस्कर जोडप्याचा जीवनपट उलगडतो. मदुमलाई राष्ट्रीय उद्यानामध्ये चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट, मानव आणि वन्यजीव यांच्यातील प्रेमळ बंध अधोरेखित करतो. या श्रेणीमध्ये अकादमी पुरस्कार मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.