छत्रपतींच्या स्वराज्याची संकल्पना शाहूंनी वृद्धिंगत केली- कुलगुरू प्रा. येवले

राजर्षी शाहू जयंती निमित्त विद्यापीठात रक्तदान शिबिरामध्ये १६६ पिशव्या रक्त संकलन

औरंगाबाद ,२६ जून /प्रतिनिधी :- शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. ते स्वराज्य वृद्धिंगत करून त्याचे अधिकाधिक लोकाभिमुख सुराज्य करण्याचे काम करवीर संस्थानात राजर्षी शाहूंनी केले आणि आधुनिक लोकशाहीचा पाया भक्कम केला असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांनी केले.

ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे व छत्रपती राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळ सभागृह येथे आयोजित भव्य रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सारथीचे अधिकारी वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख अध्यासन केंद्राचे संचालक डॉ कैलास अंभुरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. संजय सांभाळकर, रासेयोचे संचालक डॉ. आनंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पुढे बोलताना कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले म्हणाले, की मराठा व कुणबी मराठा समाजातील मुलांना आर्थिक पाठबळ मिळावे व समाज उपयोगी माणसे घडावीत या उद्देशाने सारथी संस्था कार्य करत आहे. अलीकडील काळात नोकऱ्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे त्यापलिकडे जाऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करून विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करावे. तसेच शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विद्यापीठाने कायमच सामाजिक बांधिलकीला महत्त्व दिले आहे याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवत असल्याचा आनंद आहे. युवकांनी चौकटीच्या बाहेर येऊन विचार केला पाहिजे. तसेच नोकरीसाठी शिक्षण असा विचार टाळून सामाजिक उत्तरदायित्वाची सतत जाण ठेवून कार्य करावे असेही ते म्हणाले. 


या रक्तदान शिबिरामध्ये एकूण  सहभाग नोंदवला एकूण ५६९ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला व १६६ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
या शिबिराकरिता विभागीय रक्‍तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय, औरंगाबाद, विद्यार्थी विकास मंडळ, राष्‍ट्रीय सेवा योजना, कमवा व शिका, राष्‍ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, स्‍टुडन्‍ट फेडरेशन ऑफ इंडिया, सम्‍यक विद्यार्थी आंदोलन, राष्‍ट्रीय विद्यार्थी कॉंग्रेस, सत्‍यशोधक विद्यार्थी संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मराठवाडा असोशिएशन फॉर स्‍टुडन्‍ट (मास),  व द पीपल्‍स पोस्‍ट यांचे विशेष सहकार्य लाभले.  याप्रसंगी डॉ.ओमप्रकाश जाधव, डॉ. भास्कर साठे, डॉ. मदन सूर्यवंशी, धनंजय पाटील, डॉ. प्रगती फुलगिरकर, डॉ. सुनिता शेरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव काशीद यांनी केले तर आभार डॉ. कैलास अंभोरे यांनी मानले.