पंडित बिरजू महाराजांनी शास्त्रीय नृत्य लोकाभिमुख केले – राज्यपाल कोश्यारी

नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिरजू महाराज यांना श्रद्धांजली

मुंबई ,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी आपले  संपूर्ण आयुष्य नृत्यकलेला समर्पित करताना भारतीय शास्त्रीय नृत्य अधिक लोकाभिमुख केले. अभिजात शास्त्रीय नृत्याचे ते आंतरराष्ट्रीय राजदूत होते. बिरजू महाराज प्रयोगशील होते व अनेकदा त्यांनी नवतेचा अंगिकार केला. संगीत व तबल्याची विशेष जाण असलेल्या पं. बिरजू महाराजांचा महाराष्ट्राशी घनिष्ठ स्नेह होता. अनेक शिष्योत्तम घडवून त्यांनी आपले ज्ञान मुक्तपणे वाटले व गुरुसेवा केली. पंडित बिरजू महाराज यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या शिष्यपरिवार तसेच कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिरजू महाराज यांना श्रद्धांजली

मुंबई :- कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराज म्हणजे नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांचे नृत्य आणि संगीत क्षेत्रातील योगदान अमूल्य असे आहे. त्यांनी भारतीय कलेचे वैभव सातासमुद्रापार नेले. कला क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा मानदंड निर्माण केला. नृत्य, संगीत हेच त्यांचे आयुष्य होते. ते सर्जक कला उपासक होते. त्यांचे कलारसिकांच्या हृदयातील स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहील. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना विनम्र श्रध्दांजली.

पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानं देशानं महान कलावंत, महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“प्रसिद्ध कथ्थक नृत्यकलावंत, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज हे भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्यक्षेत्रातलं स्वतंत्र विद्यापीठ होते. तरुण कलावंतांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या, त्यांच्यासाठी मार्गदर्शक, दीपस्तंभाचं काम केलं.  कथ्थक नृत्यकलेला देशात, सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली. कोट्यवधी रसिकांना मनमुराद आनंद दिला. पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या पंडित बिरजू महाराजांना आदर, मान-सन्मान, लोकप्रियता मिळवून देण्याचं काम महाराष्ट्रानं सातत्यानं केलं. महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता बाळगणारे, पश्चिम बंगालला आई, महाराष्ट्राला वडील मानणारे ते कलावंत होते. पंडितजींच्या निधनानं देशानं महान कलावंत, महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला आहे. पंडितजींच्या कुटुंबियांच्या, त्यांच्या कोट्यवधी रसिकांच्या दु:खात मी देखील सहभागी आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने कला, नृत्य क्षेत्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने कला, नृत्य क्षेत्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

कथ्थक या नृत्य प्रकाराला देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या  प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने भारतीय कला आणि नृत्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, या शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

शोकसंदेशात मंत्री श्री.देशमुख म्हणतात, पंडित बिरजू महाराज हे एक गुरू, नृत्यकार, कोरिओग्राफर, गायक आणि संगीतकार होते. जगभरात त्यांचे अनेक शिष्य आता प्रसिद्ध कलाकार आहेत. कथ्थक नृत्य प्रकारात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बिरजू महाराज यांनी विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शनही केले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानाने  देखील त्यांचा गौरव झाला आहे.  नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले, इतकं वैविध्यपूर्ण कार्य त्यांनी नृत्य क्षेत्रात केले आहे.

पंडित बिरजू महाराज यांनी महाराष्ट्राला आपला पिता आणि बंगालला माता मानले होते. त्यांच्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली पण  विविध मानसन्मान व नावलौकिक त्यांना महाराष्ट्राने दिले, असे पंडित बिरजू महाराज यांनी एकदा म्हटले होते, त्यावरून त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा अभिमान दिसून येतो. अशा या जगप्रसिद्ध कथ्थक नृत्यगुरुंच्या निधनामुळे भारतीय कला, संगीत आणि नृत्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे असे सांगून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.