मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून आता 75 टक्के अनुदानावर मिळणार शेततळे

लातूर जिल्ह्यासाठी 375 शेततळ्यांचे उद्दिष्ट

लातूर,२७ मार्च  / प्रतिनिधी :-पावसावर विसंबून असलेल्या कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी 75 टक्के म्हणजेच सुमारे 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेतून लातूर जिल्ह्याला 375 शेततळ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून इच्छुक शेतकऱ्यांना महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

यापूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेतून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ दिला जात होता. या योजनेतून जास्तीत जास्त 50 हजार रुपयापर्यंत अनुदान देय होते. आता मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 75 हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारण कमाल मार्यादा नाही. शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून शेततळ्यासाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

महाडीबीटी पोर्टलवर कृषि विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे एकत्रित सोडतीमध्ये शेततळ्यासाठी लाभार्थी निवडीचा निर्णय घेतला जातो. उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शेततळ्याच्या आकारमानानुसार 14 हजार 433 रुपयांपासून 75 हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेत अनुदान दिले जाते. शेततळ्याचा आकार 15X15X3 पासून 34X34X3 मीटर पर्यंत असू शकतो. जास्त आकारमानाचे शेततळे घेण्यासाठी मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च लाभार्थ्यानी स्वत: करायचा आहे. तसेच 75 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च ही लाभार्थ्यांने स्वत: करणे अनिवार्य आहे.

असा घ्या योजनेचा लाभ

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर शेततळ्यासाठी वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करावी. आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे व वैयक्तिक तपशील व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरावी. अर्जाचे शुल्क 23 रुपये 60 पैसे असे आहे. अर्जासोबत सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, जातीचा दाखला व हमीपत्र इ. कागदपत्रे अपलोड करावीत. नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

जिल्ह्यासाठी 375 शेततळ्यांचा लक्षांक; 519 अर्ज प्राप्त

लातूर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत 375 शेततळ्यांचा लक्षांक देण्यात आला आहे. लातूर तालुक्यासाठी 48, औसा तालुक्यासाठी 65, निलंगा तालुक्यासाठी 49, रेणापूर तालुक्यासाठी 33, शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी 16, उदगीर तालुक्यासाठी 49, देवणी तालुक्यासाठी 17, चाकूर तालुक्यासाठी 33, अहमदपूर तालुक्यासाठी 48 आणि जळकोट तालुक्यासाठी 17 असा शेततळ्यांचा लक्षांक आहे. तर आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर लातूर तालुक्यातून 47, औसा तालुक्यातून 35, निलंगा तालुक्यातून 23, रेणापूर तालुक्यातून 57, शिरूर अनंतपाळ तालुक्यातून 27, उदगीर तालुक्यातून 257, देवणी तालुक्यातून 16, चाकूर तालुक्यातून 26, अहमदपूर तालुक्यातून 15 आणि जळकोट तालुक्यातून 16 असे एकूण 519 अर्ज प्राप्त झाले आहेत. लॉटरीद्वारे आतापर्यंत 240 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.