शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसविण्यास शासन प्रयत्नशील – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती, काही दिवसातच समितीची निर्णय अपेक्षित

लातूर ,२२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढी पर्यंतचे सोयाबीन पीक नष्ट करते यावर कीटकनाशक फवारले तर पक्षाच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असून,ती लवकरच यावर उपाययोजनेसाठी योग्य तो निर्णय देईल. हे एन डी आर एफ च्या कक्षेत बसत नसले तरी केंद्राकडे पाठपुरावा करु तसेच पंतप्रधान पीक विम्याच्या कक्षेत कसे बसवता येईल आणि अधिकाधिक मदत कशी देता येईल याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्यांच्या सोबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार होते.

आज औसा तालुक्यातील एरंडी आणि जय नगर येथील शिवरातील प्रादुर्भाव झालेल्या शेतीची त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री आ. संजय बनसोडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर, कृषी विभागाचे सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, विभागीय जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र पाटील उपस्थित होते.

एरंडी गावाच्या शिवारात कृषी मंत्री गेले असताना, शंखी गोगलगाय गोळा केलेल्या ठिकाणी थांबून, ती सोयाबीन कशी खाते याबाबत त्यांनी सांगितले. आ. अभिमन्यू पवार यांनीही शंखी गोगलगाय कशी सोयाबीन फस्त करते याची चित्रफितही दाखविली.
आपण अनेक जिल्ह्याचा दौरा करून आलो असून याबाबत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना याबाबत अवगत करणार असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.