खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण गोविंदांना देण्यात येणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : गोविंदांना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले आहे. अनेकांनी सरकारच्या या घोषणेला विरोध दर्शवला आहे. यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदांना वेगळे आरक्षण नाही खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.

गोविंदांना पाच टक्क्याचा आरक्षण नाही. सर्व प्रकारच्या खेळाडूंना पाच टक्क्याच आरक्षण आहे. खेळाडूच दर्जा मिळाल्यानंतर त्याची मानकं तयार होतील. एक दिवस कोणी गोविंदा खेळायला गेले म्हणून आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण गोविंदांना देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.