भारत आता दुर्बळ राहिलेला नाही, आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो, मात्र कुणी आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही 

झज्जर :-भारताकडे वक्र दृष्टीने बघणाऱ्या कुणालाही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपली सशस्त्र दले पूर्णपणे सुसज्ज आहेत अशा शब्दात, संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी राष्ट्राला आश्वस्त केले आहे.  हरयाणात झज्जर इथे आज 13 नोव्हेंबर 2022 रोजी एका कार्यक्रमाला संबोधित करताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले  की राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे  लक्ष पूर्णपणे केंद्रीत आहे आणि भविष्यातील आव्हानांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी लष्कराला अत्याधुनिक आणि स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांनी/उपकरणांनी शस्त्रसज्ज केले जात आहे. 

भारत आता दुर्बळ देश राहिलेला नाही;  आम्हाला शांतता हवी आहे, मात्र कुणी आम्हाला उपद्रव दिला तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, आपल्या सैनिकांनी हे वारंवार सिद्ध करुन दाखवले आहे.  2016 चा लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक), 2019 चा बालाकोट हवाई हल्ला आणि गलवान खोऱ्यात आपल्या सैनिकांनी गाजवलेले शौर्य हे आपल्या पराक्रमाचा आणि सज्जतेचा सज्जड पुरावा आहेत,” असे  राजनाथ सिंह म्हणाले.

वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असेही संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.

झज्जर इथे आज झालेल्या या कार्यक्रमात, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते महान लढवय्या राजा पृथ्वीराज चौहान यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.  पृथ्वीराज चौहान हे  एक महान शासक  होते, त्यांनी केवळ मोठ्या प्रदेशावर  राज्यच केले असे नाही तर ते शौर्य, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक देखील होते, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी पृथ्वीराज चौहान यांचा गौरव केला.