बेन स्टोक्सच्या संयमी अर्धशतकाने इंग्लड बनली टी-२० चॅम्पियन

मेलबर्न :-इंग्लंडने आयसीसी टी-२० विश्वचषकच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट्सनी मात करत टी-२० विश्वकपावर आपले नाव कोरले. या सामन्यात खरा हिरो ठरला तो अष्टपैलू बेन स्टोक्स. कारण पाकिस्तानचे १३८ धावांचे माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लड संघाची स्थिती सुरुवातीला बिकट झाली होती. ४५ वर ३ विकेट असताना अष्टपैलू बेन स्टोक्सने संयमी खेळी करत अर्धशतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला. त्याला हॅरी ब्रुक आणि मोईन अलीची चांगली साथ लाभली.

पाकिस्तानने इंग्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ विकेट्स गमावून १३७ धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजी या सामन्यात अपयशी ठरली. सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने ३२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. इंग्लडने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला असून २०१०मध्ये त्यांनी पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता.

सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय बोलर्सनी अगदी योग्य असल्याचं दाखवत अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या १३७ धावांमध्ये पाकिस्तानला रोखले. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिझवान यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण १५ धावा करुन रिझवान बाद झाला. मग मोहम्मद हॅरीसही ८ धावांवर बाद झाला.

कर्णधार बाबर चांगली फलंदाजी करत होता, पण ३२ धावा करुन तोही तंबूत परतला. इतरही फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण शान मसूदने फटकेबाजी करत २८ चेंडूत ३८ धावा ठोकत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. इतर फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने १३७ धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. इंग्लंडकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण अष्टपैलू सॅम करनने ४ ओव्हरमध्ये केवळ १२ धावा देत ३ महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशीद यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतले. बेन स्टोक्सनं एक महत्त्वाची विकेट घेतली.