कापडी पिशवीचे 19 रूपये: बिग बाजारला ग्राहक आयोगाचा दीड हजार रुपये दंड

नुकसानभरपाई देण्याचे आदेश 

जालना,२५ मार्च /प्रतिनिधी :-खरेदी केलेले सामान नेण्यासाठी  कापडी पिशवी चे चक्क  19 रुपये आकारून  ग्राहकांची बिग लूट सुरू असल्याचा प्रकार  औरंगाबाद शहरातील बिग बाजार मध्ये उघडकीस आला असून याप्रकरणी ग्राहकास नुकसान भरपाईपोटी दीड हजार रुपये देण्यासह वैयक्तिक अपघात विम्याच्या नावाखाली घेतलेल्या रकमेबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश जालना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बिग बाजार ला दिले आहेत. 
भंपकबाजी च्या नावाखाली ग्राहकांची  लूट करणाऱ्या बिग बाजारच्या बिग लुटीची पोलखोल करणाऱ्या  या प्रकरणाची अधिक माहिती अशी, जालना येथील अश्विनी महेश धन्नावत यांनी बिग बाजार च्या दालनात खरेदी करून त्या काउंटरवर गेल्या असता कर्मचाऱ्याने पिशवीच्या पैशाची मागणी केली परंतु सामान खरेदी केल्यानंतर वेगळी पिशवी घ्यावी लागेल असे दालनात कुठेही नमूद नव्हते, तरीही बिलात 19 रुपये आकारले तसेच 2.33 व 2.36 रू. वैयक्तिक अपघात विमा ची आकारणी बिलात केली .तथापि विमा किती कालावधी व किती रुपयांचा याबाबत त्यांना माहिती दिली नाही, आपल्याकडून अतिरिक्त पैसे आकारल्याचे लक्षात आल्यानंतर अश्विनी धन्नावत यांनी  शुल्काबाबत विचारणा केली असता  व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे अश्विनी धन्नावत  यांनी  ॲड. महेश धन्नावत, यांच्यामार्फत जालना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे बिलांच्या पुराव्यासह रितसर तक्रार दाखल केली. 

आयोगाने नोटीस देऊनही बिग बाजार चे प्रतिनिधी सुनावणीस गैरहजर राहिले. तेव्हा तक्रार अर्ज ,दाखल कागदपत्रांचे अवलोकन करून  आयोगाच्या अध्यक्षा  श्रीमती नीलिमा संत, सदस्या अनिता कांकरिया व मनीषा चितलांगे यांनी राष्ट्रीय आयोगाने 975 ते 988 /  2020 च्या दिलेल्या  संदर्भान्वये  ग्राहकास मोफत पिशवी न देणे, तशी सूचना न लावणे, विक्री केलेल्या पिशवीचे विवरण  न देणे, माल नेण्यायोग्य परिस्थितीत नीट बांधून न देणे ,या बाबी सेवेतील कमतरता आणि अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब दर्शवितात असे नमूद करत आदेशापासून 60 दिवसांच्या आत कॅरीबॅग साठी आकारलेली 19 रुपये रक्कम, नुकसान भरपाई व तक्रार अर्ज मिळून दीड हजार रुपये  अश्विनी धन्नावत यांना अदा करावेत तसेच वैयक्तिक अपघात विमा रक्कम बाबतचे सर्व विवरण  अर्जदारास लेखी स्वरुपात द्यावेत असे आदेश दिले आहेत. 


ग्राहकांनी जागृत पणे मूल्यांचे विवरण घ्यावे: ॲड महेश धन्नावत 


दुकान, मॉल व अन्य ठिकाणी खरेदी केल्यानंतर सामान घेऊन जाण्यासाठी पिशवी तसेच ते नेण्या योग्य बांधून देण्याची जबाबदारी ही संबंधित प्रतिष्ठान मालक, व्यवस्थापनाची असते तो ग्राहकांचा अधिकारच आहे. मात्र ग्राहकांना या बाबत  माहिती नसल्याने  पिशवी च्या नावाखाली शुल्क आकारले जाते, पूर्वपरवानगीशिवाय वैयक्तिक अपघात विमा ची रक्कम घेता येत नाही ,तरीही काही ठिकाणी ही रक्कम घेतली जाते  कोणत्या पात्रतेवर, आधारावर विम्याची रक्कम ठरवली याबाबत ग्राहकांनी जागृकपणे  संबंधित व्यवस्थापनाकडे खुलासा मागावा आणि आपली लूट टाळावी असे ” ग्राहक राजा जागा हो”  या ग्रंथाचे लेखक ॲड .महेश धन्नावत यांनी सांगितले.