वाळूज ‍परिसरास सुरळीत वीजपुरवठ्यासाठी होणार पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ

132 केव्ही उपकेंद्रात तीन दिवस चालणार काम

पर्यायी व्यवस्थेतून करणार वीजपुरवठा  

ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर,२३ मार्च  / प्रतिनिधी :-  वाळूज परिसरातील ग्राहकांच्या विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महापारेषणच्या एमआयडीसी एल सेक्टरमधील 132 केव्‍ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. 24 ते 26 मार्च असे तीन दिवस चालणाऱ्या कामासाठी ग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा केला जाणार आहे. तथापि, आपात्कालिन ‍परिस्थितीत भारनियमन करण्याची गरज पडल्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण व महापारेषणने केले आहे.

    वाळूज परिसरातील ग्राहकांच्या विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्रातील सध्याच्या 50 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून ती 80 एमव्हीए करण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आलेले आहे मात्र उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता हे काम तातडीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे 24 ते 26 मार्च (शुक्रवार ते रविवार) असे तीन दिवस हे काम करण्यात येणार आहे. या उपकेंद्रावरील 33 केव्ही लिंबेजळगाव व 33 केव्ही रांजणगाव पोळ या उपकेंद्रातील भार 132 केव्ही गंगापूर उपकेंद्रावरील 33 केव्ही वीर गुर्जर वाहिनीवर वळवण्यात येत आहे. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही या दरम्यान आपात्कालिन ‍परिस्थितीत भारनियमन करण्याची गरज पडल्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण व महापारेषणने केले आहे. पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतावाढीनंतर या भागास सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यास मदत होणार आहे.