‘न्याययंत्रणा तुमच्या बुडाखाली घेणार का?’, उद्धव ठाकरेंचा परखड सवाल!

बाबासाहेब आणि ठाकरेंचं नातं सांगत वंचितशी युतीचे संकेत

मुंबई ,२० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. लोकशाही तुडवून सत्ता हवी असेल तर अशी माणसे सत्तेसाठी लायक नाहीत, यांना खाली खेचायला हवं असं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकांना जागे करून पुढे काहीच करणार नसू तर आपल्याला आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सामान्यांसाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, असं म्हणत ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. सगळं मला पाहिजे या हव्यासापोटी सत्ता काबीज केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी यावेळी केला आहे.

राज्यघटना पायदळी तुडवून सत्ता पाहजे यांना पहिलं खाली खेचले पाहिजे, असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलंय. ही लोकं सत्तेसाठी लायक नाही. देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याचं विधान देखील त्यांनी यावेळी केलं आहे. न्याययंत्रणा तुमच्या बुडाखाली घेणार आहात का? असा परखड सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला आहे.

प्रबोधनकार डॉटकॉम या वेबसाईटचं लोकार्पण उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी ठाकरे आणि आंबेडकर एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांचा हवाला देत आपण जर लोकशाही वाचवू शकलो नाही, तर  आपल्याला प्रबोधनकार आणि बाबासाहेबांचा नातू म्हणून घेण्याचा अधिकार नाही, असंही वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरांसोबत युतीचे संकेत दिले आहेत. आंबेडकर आणि आमची वैचारिक बैठक एकच आहे, स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आपण दोघांनी एकत्र येऊ, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना यावेळी केले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राज्यात नवी युती उभी राहणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.