पीएम स्वनिधी योजनेच्या 2 हजार 40 लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट कर्जाचे वितरण

छोट्या व्यावसायिकांनी आत्मनिर्भरतेसाठी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

जालना,१ मार्च  / प्रतिनिधी :-   कोरोना साथीच्या आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, लोक घराबाहेर पडू शकले नाहीत आणि छोट्या- छोट्या व्यवसायिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. अशा परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करणाऱ्या फळे व भाज्या विक्रेत्यांना व अन्य छोट्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही समस्या लक्षात घेवून केंद्र सरकारने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. या पीएम स्वनिधी योजनेचे मुख्य उद्दिष्ट पथ विक्रेत्यांना स्वावलंबी आणि सशक्त बनविणे हेच आहे. रस्त्यावर छोटे व्यवसाय करणाऱ्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा व इतरांना लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करुन बँकेत आपली पत राखावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

पीएम स्वनिधी योजनेचा कर्ज ‍वितरण मेळावा जालना शहरातील भोकरदन नाक्यावरील भारती लॉन येथे आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, भास्करराव दानवे, उद्योजक घनश्याम गोयल, सतिश घाडगे, अशोक पांगारकर, राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, बद्री पठाडे, देविदास देशमुख, भागवत बावणे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक सुरज यामीनवार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्य व्यवस्थापक गणेश कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. दानवे म्हणाले की, रस्त्यावरील छोटे व्यावसायिक आत्मनिर्भर होण्यासाठी पीएम स्वनिधी योजना केंद्रस्तरावरुन बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. आज डिजीटल प्रक्रियेद्वारे केवळ एका क्लिकवर पीएम स्वनिधी योजनेच्या 2 हजार 40 लाभार्थ्यांना 2 कोटी 18 लाख रुपये त्यांच्या थेट बँक खात्यावर कर्ज वितरण मेळाव्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच यापुर्वी 2 हजार 453 लाभार्थ्यांना 2 कोटी 98 लाख रुपयांचे वाटप जिल्ह्यात करण्यात आले असल्याचे सांगितले. गरिबांना रोजच्या गरजा भागविता येण्यासाठी शासनाकडून विविध योजनेची आखणी करण्यात आली असून शौचालय, प्रधानमंत्री आवास योजना, विज योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत आरोग्य कार्ड, पीएम किसान योजना, मागेल त्याला शेततळे आदी योजनांच्या माध्यमातून राज्यातील सर्व व्यक्तींना दिलासा देण्याचे काम करण्यात येत आहे. पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात 7 हजार व्यक्तींना लाभ देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये कर्ज दिले जाईल त्याची परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार रुपये देण्यात येतील आणि त्याची परतफेड केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 50 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. या सर्व कर्जावर एकुण 10 टक्के व्याज आकारणीमध्ये शासन 7 टक्के व्याज भरेल आणि केवळ 3 टक्के व्याज हे प्रत्यक्ष लाभार्थ्यांने भरणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले की, नगर परिषदांनी मागील पंधरा दिवसापासून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेसाठी कौतूकास्पद काम करुन आज 2 हजार 40 लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा केला. पीएम स्वनिधी योजनेत लाभार्थ्यांना केवळ एकच अर्ज लाभ घेण्यासाठी भरावा लागतो. पहिल्या टप्प्यात 10 हजार, दुसऱ्या टप्प्यात 20 हजार आणि तिसऱ्या टप्प्यात 50 हजार रुपये कर्जाचे वितरण करण्यात येते. जालना जिल्ह्याला 7 हजार 800 उद्दीष्ट प्राप्त झाले असून जे विक्रेते शिल्लक राहतील त्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी केले. तर आभार जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी मानले. मेळाव्यात पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमात भास्करआबा दानवे, सुरज यामीनवार, श्री.कुलकर्णी, प्रेषित मोघे आदींची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध बँकेचे अधिकारी, नागरिक, पथविक्रेते, भाजी विक्रेते, महिला व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.