फायदेशीर शेतीसाठी उच्च कृषि तंत्रज्ञान अत्यावश्यक-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

कृषी क्षेत्रात उद्योगाच्या अनेक संधी

नांदेड,१ मार्च / प्रतिनिधी :-  फायदेशीर शेतीसाठी उपलब्ध असलेल्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, नानाजी कृषी संजीवनी योजना, स्मार्ट प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी साहाय्य अशा कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

कृषि महोत्सव व माविमच्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नांदेड, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बालविकास विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा नांदेड येथे करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर जज, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रकल्‍प उपसंचालक, आत्‍मा सौ. एम. आर. सोनवणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड, शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, प्रगतीशिल शेतकरी, बचत गटातील महिला आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतमालावर आधारित उद्योग उभारले पाहिजेत. उत्पादन वाढून उत्पादनाच्या विक्रीवरही भर दिल्यास यातून शेतकऱ्यांना जास्त लाभ होऊ शकतो असे राऊत यांनी सांगितले. कोरोना कालावधीत शेती व शेतकऱ्यांनी साथ दिल्यामुळे बाजारपेठ सुरू राहिली हे विसरता येणार नाही. शेतीची उन्नती झाल्याशिवाय आपली प्रगती नाही. शेतीत निसर्गाची अनेक आव्हाने येतात. कोणी आपला शेतकरी बांधव नैराश्यात गेला असेल तर त्याला सावरण्यासाठी प्रगतीशील शेतकऱ्यांनी त्यांना धीर द्यावा व त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास साहाय्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

नवीन तंत्रज्ञान, उत्पादने, सर्व शासकीय योजना, शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी केलेली प्रगती यासह शेतकऱ्यांसाठी अनेक उपयुक्त बाबींची माहिती या मेळाव्यात होणार आहे. शेतीसाठी लागणारे यंत्र, अवजारे यांच्या योजनेची माहिती कृषि विभागाच्या स्टॉलवर मिळेल. तसेच नागरीकांनी आपल्या आरोग्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

पुढील चार दिवस चालणाऱ्या या कृषि महोत्सवातील स्टॉलला नागरिकांनी भेट देवून शेतकरी व बचत गटातील महिलांनी तयार केलेली उत्पादने खरेदी करावेत, असेही आवाहन श्री. चलवदे यांनी केले.

महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी बचतगटाची चळवळ मोलाची

या कृषी महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन व मेळाव्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. बचत गटांमुळे त्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला असून त्या स्वत: चे उत्पादन तयार करीत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी बचत गटाची चळवळ मोलाची असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी प्रास्ताविक करुन बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तुचे उत्पादन, विक्री याबाबत माहिती दिली. यावेळी न्यायाधीश दलजित कौर जज, शास्त्रज्ञ देविकांत देशमुख, डॉ. शिवाजी शिंदे, प्रल्हाद इंगोले आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.