वैजापूर – येवला रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक ठार तर एक जण जखमी

वैजापूर ,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाला.हा अपघात शनिवारी सकाळी १० वाजता वैजापूर येवला रस्त्यावर नांदुर मधमेश्वर कालवा विभाग कार्यालयासमोर घडला. 

सचिन सुधाकर चव्हाण ( वय 35 वर्षे रा.उपविभागीय अधिकारी कार्यालयामागे, वैजापूर ) असे या अपघातातील मयत युवकाचे नाव आहे. तर हर्षद चिकने ( रा. खामगाव ता.येवला ) असे जखमीचे नाव आहे.

सचिन सुधाकर चव्हाण

  सचिन चव्हाण यांची पत्नी कविता या येवला रोडवरील कैलास पाटील  महाविद्यालयात शिक्षिका आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे सचिन हे कविता यांना सोडून शहरात येत होते. त्याचवेळी हर्षद हा शहरात दूध टाकून गावाकडे परतत असताना नांदूर मध्यमेश्वर पाटबंधारे विभागासमोर या दोघांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. सचिन यांच्यावर शहरात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सचिनचे उपचार सुरू असताना निधन झाले. त्याच्यावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ भावजयी असा परिवार आहे. सचिन हा येथील पालिकेचे  सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकर चव्हाण यांचा मुलगा होता.