अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकास अटक ; बलात्कार व पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

वैजापूर ,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी पोलीसांनी बोरगाव अर्ज ता फुलंब्री येथून एकास मंगळवारी ताब्यात घेतले.राम संतोष चव्हाण रा. पाटील गल्ली वैजापूर असे आरोपीचे नाव असून त्याचे विरूद्ध बलात्कार व पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  राम चव्हाण याने 08 फेब्रुवारी रोजी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून तसेच आमीष दाखवून पळवून नेले होते.तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.तो बोरगाव अर्ज येथे एका विटभट्टीच्या कामावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  मिळालेल्या माहितीच्या आधारे फौजदार मनोज पाटील व पोलीस नाईक मोईस बेग, महिला होमगार्ड उज्ज्वला त्रिभुवन यांच्या पथकाने  बोरगांव अर्ज शिवारातील विट भट्टी येथे जाऊन  पिडीत अल्पवयीन मुलगी व तिस पळवून नेणारा आरोपी राम चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. 

  सहाय्यकक पोलीस अधीक्षक महक स्वामी ,  पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई पार पाडली. सदर आरोपीने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी तिचे इच्छेविरुद्ध बलात्कार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्याचे विरुद्ध पोलीसात इतरही काही गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणात त्याचे विरूद्ध बलात्कार व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील न्यायालयासमोर त्यास हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अधिक तपास फौजदार मनोज पाटील हे करीत आहेत.