वैजापूर तालुक्यात पुन्हा ‘सैराट’ ; प्रेम प्रकरणातून दहावीच्या विद्यार्थ्यांचा खून ..?

ऑनर किलींगचा संशय ; मुलीचे वडील व काका पोलिसांच्या ताब्यात 

वैजापूर ,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- काही दिवसांपुर्वी अपहरण झालेल्या दहावीच्या वर्गातील मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी वैजापूर तालुक्यातील भिवगाव शिवारात आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन प्रभाकर काळे (वय 16 वर्ष) असे मृताचे नाव असुन तो तालुक्यातील विनायकनगर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. शाळेतील एका मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन मुलीच्या घरच्यांनी त्याचा घात केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी मुलीचे वडील व काका या दोघांना ताब्यात घेतले असुन चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, मयत सचिन काळे हा विनायक नगर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. काही दिवसांपुर्वी अपहरण झाल्याने वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी भिवगाव शिवारात गट क्रमांक 231 मध्ये भास्कर माधव गायके यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेतील मुलाचा मृतदेह आढळुन आला.‌ तो मृतदेह अपहरण झालेल्या सचिन काळेचा असल्याची खात्री पटली.‌ पोलिस उपअधिक्षक महक स्वामी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, मोईस बेग, राम कवडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणात मुलीचे वडील व काका या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अपहरण झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून हा खून नेमका कुणी केला याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.