रोटेगाव ग्रामपंचायत कार्यालयाला पदाधिकाऱ्यांनी टाळे ठोकले

मासिक सभेला ग्रामसेविका गैरहजर राहिल्याने घडलेला प्रकार


वैजापूर ,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- मासीक सभा बोलावून ग्रामसेविका या सभेला गैरहजर राहिल्याने संतप्त सरपंच , उपसरपंच यांच्या सह सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.ही घटना तालुक्यातील रोटेगाव ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (ता.27) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर आक्रमक झालेले पदाधिकारी ग्रामसेविकेची तक्रार देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आले.मात्र एक ते दिड तास थांबूनही गटविकास अधिकारी कार्यालयात हजर न झाल्याने ते रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन घरी परतले.

या दोन्ही घटनांमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला.सोमवार हा वैजापूर येथील आठवडी बाजाराचा दिवस असतो. यादिवशी बाजार निमीत्ताने आलेले नागरीक आपली कामे करण्यासाठी सुद्धा येत असतात.परंतु अधिकारी व कर्मचारी असे मनमानीपणे वागत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

रोटेगाव ग्रामपंचायतीची मासीक सभा ग्रामविकास अधिकारी यु.आर.मोकळे यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता आयोजित केली होती. यासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्य वेळेवर कार्यालयात हजर झाले.काही नागरीक सुद्धा काम घेऊन कार्यालयात येऊन बसले.  मात्र साडे अकरा वाजून सुध्दा मोकळे या कार्यालयात हजर झाल्या नाही.त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले. नागरीकांचा रोष पाहून सरपंच यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले.तेथून तक्रार देण्यासाठी पदाधिकारी थेट पंचायत समिती कार्यालयात पोहोचले.मात्र तेथे देखील त्यांना वेगळेच चित्र पहायला मिळाले. गटविकास अधिकारी हे कार्यालयात हजर नसल्याने त्यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून तेथे त्यांनी निवेदन ठेवले.

रोटेगाव ग्रामपंचायत च्या ग्रामसेवक यु आर मोकळे या कार्यालयात हजर राहत नाही.त्या सरपंच व सदस्यांना माहीती देत नाही.त्यामुळे त्यांची त्वरीत बदली करावी.अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.