वैजापूर शहर व परिसरात तासभर मुसळधार पाऊस:वैजापूर तालुक्यात खरीप पेरण्यांना वेग

वैजापूर ,२८ जून  /प्रतिनिधी :-वैजापूर शहर व परिसरात सोमवारी दुपारी सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडला. दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत शहरासह परिसरात व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मुसळधार सरी कोसळल्या. त्यामुळे खरीप पेरण्यांच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी आनंदीत झाला आहे.‌

तालुक्यात मान्सुन पुर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर मान्सुनचे आगमन होताच मृग नक्षत्रात तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. पहिल्या पावसावर तालुक्यातील काही मंडळात शेतकऱ्यांनी मका लागवड केली. साधारणपणे सर्व मंडळात सरासरी 52 मि.मी.इतका पाऊस पडल्याची नोंद झाली होती. मात्र खरीप पेरणीसाठी 75 मि.मी. पावसाची आवश्यकता असल्याने सर्व मंडळात अद्याप पेरणीस सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. त्यातच मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होता.

आज, सोमवारी सकाळपासुन पावसाच्या हलक्या सरी कोसळत्या सुरुवात झाली होती. वातावरण ढगाळ होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस पडल्याने आठवडी बाजारात एकच धांदल उडाली.‌ या पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग येणार आहे.