पहाटेच्या शपथविधीबाबत मी मस्करीत बोललो!-दोनच दिवसात शरद पवारांनी भूमिका बदलली

मुंबई ,२४ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-पहाटेचा शपथविधी झाला नसता तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली नसती, असे विधान केलेल्या शरद पवार यांच्या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात नेहमीप्रमाणे संभ्रम निर्माण झाला. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या संधीचा फायदा घेत शरद पवारांनी काही खुलासा केला हे चांगले आहे. आता माझी त्यांच्याकडून अजून अपेक्षा आहे की, राष्ट्रपती राजवट का लागली? कोणाच्या सांगण्यावरून लागली? त्याच्या पाठीमागे काय होते? यासंदर्भातला खुलासा त्यांनी केला, तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतील, त्यामुळे यासंदर्भातले उत्तरही त्यांच्याकडून यावे, अशी माझी अपेक्षा आहे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

यामुळे आयतेच कोंडीत सापडलेल्या शरद पवारांची चांगलीच गोची निर्माण झाली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पवारांनी आता ते मी मस्करीत बोललो, अशी भूमिका घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सकाळच्या शपथविधीचा सस्पेन्स तीन वर्षांनंतरही कायम आहे. नुकतेच अजित पवारांसोबतचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करून झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे खळबळ माजली. ‘आता अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजने वाले को इशारा काफी है,’ असे सूचक विधान शरद पवारांनी केले.

फडणवीसांनी केलेल्या पलटवारामुळे शरद पवारांनी अवघ्या दोनच दिवसात भूमिका बदलली असून पुन्हा एकदा यावर भाष्य केले आहे. ‘राष्ट्रपती राजवट हटली त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हे मी मस्करीत बोललो होतो. फडणवीसांनी माहिती द्यावी, त्याला मी इतके महत्त्व देत नाही. शरद पवारांच्या बोलण्यामुळे राष्ट्रपती राजवट लागते, इतके माझे महत्त्व आहे, चांगले आहे,’ असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य न करता या विषयाला कलाटणी दिली.