संजय राऊतांविरोधात आता बीडमध्येही गुन्हा दाखल

​​बीड,२३ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :-  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे कार्यकर्त्ये आक्रमक झाले आणि ठाणे, नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर आता बीडमध्येही संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, बीडमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा निषेध केला.

बीडमध्ये शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वात संजय राऊत यांच्याविरोधात जोडो मारो आंदोलन केले. हे आंदोलन पोलिस ठाण्यासमोर करण्यात आले. त्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात कारवाईची मागणी करणारे तक्रारपत्र पोलिसांना देण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बीड शहर पोलिसांकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली. तसेच, ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप करत असून त्यांची बदनामीकारक माहिती पसरवून समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.