जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार: मारहाण प्रकरणाचा पुन्हा तपास होणार

ठाणे: अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या मारहाण प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

अनंत करमुसे प्रकरणात राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच याचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी घेऊन जात मारहाण केल्याचा आरोप आहे.

या मारहाण प्रकरणी दिलेल्या निकालात आज सुप्रीम कोर्टाने जितेंद्र आव्हाड यांना फटकारलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आजच्या निकालात या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी मान्य केली आहे. तसेच तीन महिन्यात तपास संपवावा आणि चार्जशीट दाखल करावी असे निर्देष सुप्रीम कोर्टाने दिल्याचे करमुसे यांनी सांगितले.