ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, धोका देणाऱ्यांना शिक्षा करा:अमित शाहांनी दंड थोपटले

उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आता आली आहे-केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार
भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला सुरुवात
Image

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागचा राजाच्या दर्शनाने मुंबई दौऱ्याचा शुभारंभ केला. निमित्त दर्शनाचे असले, तरी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेतून ‘विसर्जन’ करण्याचे शाहांचे उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने ‘मिशन मुंबई’ला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शाहांनी १५० जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने २०१४ मध्ये युती तोडली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. ठाकरेंनी आम्हाला धोका दिला, त्यांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे अमित शाह यावेळी पदाधिका-यांना म्हणाले. मुंबईवर फक्त भाजपचेच वर्चस्व राहिले पाहिजे असे निर्देशही शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Image

“उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आता आली आहे, आपल्याला जर कानाखाली मारली तर फक्त शरीरालाच इजा होते पण जर घरासमोर मारली तर ती अंतर्मानपर्यंत जाते, ती वेळ आता आली आहे” अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंविरुद्धच्या लढ्याचे रणशिंग फुंकले. राजकारणात कुठलीही गोष्ट सहन करा पण धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात केला आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीका करत अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाल्याचे म्हणत फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांचे नाव वापरुन निवडून आले आणि ऐनवेळी आम्हाला धोका दिला. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. त्या उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आता आली आहे. खयाली पुलावामुळे शिवसेनेची सध्याची अवस्था झाल्याचे शाह म्हणाले.

आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केले नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला. राजकारणात धोका देणाऱ्यांचे राजकारण यशस्वी होत नाही. एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ते आपल्यासोबत आहेत. राजकारणात धोका सहन करू नका, असे म्हणत बीएमसी जिंकण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचे असून, मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. आपली ही शेवटची निवडणूक आहे असे समजा, कारण अभी नही तो कभी नही, असे शाहा म्हणाले. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

Image

मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिशन १३५ ची घोषणा केली. ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, याशिवाय नितेश राणे, अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा आदि नेते उपस्थित होते.

मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून लढा : देवेंद्र फडणवीस

आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढा, अशा आवेशपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपने ‘मिशन मुंबई’ ला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या २०० पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी भाजपकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

पुढे त्यांनी म्हटले की, मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले.आपले ‘मिशन मुंबई’ साठी सर्व पदाधिकारी, नगरसेवक भाजपा कार्यकर्त्याचे महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची, असेही फडणवीसांनी म्हटले. वॉर्ड रचना काय होईल, कसा प्रभाग असेल याचा विचार करून चालणार नाही, काम करत रहावे, असेही त्यांनी म्हटले.