डॉक्‍टराच्‍या हलगर्जीपणामूळे बाळ दगावल्याप्रकरणी डॉ. नंदिनी जनार्दन पिंपळेला दोन लाख रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

औरंगाबाद,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- डॉक्‍टराच्‍या हलगर्जीपणामूळे प्रसूतिसाठी गेलेल्या महिलेसह तिचे बाळ दगावल्याप्रकरणी आरोपी डॉ. नंदिनी जनार्दन पिंपळे (३५, रा. सदाशिवनगर, रामनगर) हिला दोन लाख रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायधीश व्‍ही.एस. कुलकर्णी यांनी ठोठावली. विशेष म्हणजे ठोठावलेल्या दंडाची रक्कम फिर्यादीला देण्‍याचे न्‍यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

प्रकरणात डॉ. नंदिनी पिंपळे हिला प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी भादंवी कलम ३०४ (अ) अन्‍वये दोषी ठरवून दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा आणि दोन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात आरोपीने जिल्हा व सत्र न्‍यायालयात अपील दाखल केले होते. प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी काम पाहिले.

प्रकरणात मयत विमल रतन जोंधळे यांचे पती रतन सांडू जोंधळे यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानूसार, १५ मे २००३ रोजी रुग्ण विमल जोंधळे यांना प्रसूतिकरिता रामनगर येथील आरोपी डॉ. नंदिनी पिंपळे हिच्‍या ममता क्लिनीक व प्रसूतिगृहात उपचारसाठी दाखल करण्‍यता आले होते. मात्र डॉ. पिंपळे यांच्‍या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान विमलसह त्‍यांचे बाळही दगावाले. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.