दारुड्या वडिलांची मुलांकडून हत्या ; वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील घटना

वैजापूर ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वडिलांच्या दारुच्या व्यसनाला कंटाळुन दोन मुलांनीच लोखंडी गज व दगडाने ठेचून त्यांचे जीवन संपवले. एव्हढ्यावरच न थांबता त्या दोघांनी आत्महत्या भासवण्यासाठी जन्मदात्यास जाळुन टाकले. ही घटना मंगळवारी (ता.07) दुपारी वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे उघडकीस आली. नारायण रुस्तम वाघ (५०) रा. धोंदलगाव असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शुभम वाघ (22) व विकास वाघ (20) या दोन भावांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धोंदलगाव येथील नारायण वाघ हे  शुभम, विकास ही दोन मुले व कुटुंबासह गोपालेश्वर मंदिर परिसरातील शेतवस्तीवर राहतात. नारायण वाघ यांना दारूचे व्यसन असल्याने त्यांचे नेहमी कुटुंबियांसोबत वाद होत होता. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ते दारू पिऊन घरी आल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. या झटापटीत नारायण वाघ यांच्या डोक्यात दगड मारण्यात आल्याने ते जखमी झाले. गंभीररित्या जखमी झाल्याने झाल्याने आत्महत्या भासवण्यासाठी दोन्ही मुलांनी वडीलांना जाळुन टाकले. घटनेनंतर रात्री उशिरा वैजापूर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी दोघां मुलांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.