तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा 

औरंगाबाद,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  घरात घुसून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या   आरोपीला एक वर्षे कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.ए. मोताळे यांनी ठोठावली. नितीन श्रीमंत जाधव (२७, रा. मुकुंदवाडी परिसर) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, ११ एप्रिल २०१७ रोजी रात्री १० वाजेच्‍या सुमारास पीडिता ही घरातील काम आवरुन हॉलमध्‍ये झोपी गेली होती, त्‍यावेळी दरवाजा लोटलेला होता व पीडितेच्या  बहिणी टिव्‍हीवर प्रोग्राम पाहत होती. त्‍यावेळी परिसरात राहणारा आरोपी नितीन जाधव हा घरात घुसला, त्‍याने पीडितेचा हात पकडला व तिच्‍याशी लगट करु लागला. पीडितेने आरडा-ओरडा करताच तेथे आलेल्या गल्लीतील लोकांसह पीडितेचे नातेवाईकांनी आरोपीला चोप दिला. त्‍यावेळी आरोपीने उलटा कांगावा करीत स्‍वत:च्‍या हाताने स्‍वत:ला मारुन घेत पोलिसात तक्रार देतो म्हणत,‍ शिवीगाळ करुन जीवे मारण्‍याची धमकी देत तेथून निघून गेला. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या प्रकरणात तत्कालीन उ‍पनिरीक्षक एम.एन. चव्‍हाण यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवळी सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३५४ अन्‍वये एक वर्षांचा कारावास आणि दोन हजार रुपयांच्‍या दंड, कलम ४५२ अन्‍वये सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन आर.एच. राठोड यांनी काम पाहिले.