नातीच्या नावावरील विम्याचे ७३ लाख हडपले:तपास अधिकाऱ्यावर खंडपीठाचे ताशेरे

औरंगाबाद,३० जानेवारी / प्रतिनिधी :- करोनामुळे मृत्यू पावलेल्या एका अधिकाऱ्याच्या मुलीच्या नावावरील ७३ लाख ५० हजार रुपये तिच्या आजी-आजोबांनीच हडपले तर काका पोलीस खात्यातअसल्याने या प्रकरणातील तपास निष्काळजीपणे होत असल्याच्या नाराजीतून औरंगाबाद खंडपीठात याचिका करण्यात आली आहे.सुनावणीवेळी न्या. अनुजा प्रभुदेसाई व न्या. आर. एम. जोशी यांनी संबंधित प्रकार तपासअधिकाऱ्याच्या निष्काळजीपणा घडल्याचे ताशेरे ओढत शपथपत्राद्वारे सविस्तर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणी किनवट तालुक्यातील मांडवी गावाजवळील निराळातांडा येथील संजीवनी सुधीर चव्हाण यांनी ॲड. राहुल तांबे यांच्यामार्फत फौजदारी याचिका केलीआहे.याचिकेनुसार त्यांचेपती सुधीर चव्हाण हे महा आयटी प्रकल्पांतर्गत मुंबईला मंत्रालयात प्रकल्प व्यवस्थापक होते.१५ जून २०२१ रोजी त्यांचे करोनामुळे निधन झाले.त्यांनी मृत्यूपूर्वी काढलेल्या जीवन विम्याचे ५१टक्के समभाग पत्नीच्या नावेआणि ४१ टक्के त्यांची मुलगी बाणीप्रिया (वय ४)हिच्या नावे केले होते.त्यानुसार संजीवनी यांना ७६ लाख ५० हजार तर बाणीप्रियाला ७३ लाख ५० हजार रुपये मिळणार होते. संजीवनी यांच्या खात्यात त्यांचीरक्कम जमा झाली. मात्र, बाणीप्रिया ही सज्ञान नसल्यामुळे तिच्या नावावरील रक्कम सुधीर यांच्या आई सिंधुताई चव्हाण यांच्या खात्यात विमा कंपनीने घोषणापत्र घेऊन जमा केले.७३ लाख ५० जमा झाल्यानंतर संजीवनी यांचा छळ सुरू झाला.त्यामुळे संजीवनी यांनी सासू-सासरे, दीर, चुलत सासरे यांच्याविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, दीर पोलीस खात्यात असल्याने त्यांच्याविरोधातील तक्रारीचा पोलीस योग्यरीतीने तपास करत नसल्याच्या नाराजीतून खंडपीठात धाव घेतल्याचे संजीवनी यांनी फौजदारी याचिकेत म्हटले आहे.