खासदार नवनीत राणांचे वडील फरार घोषित

मुंबई : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केले आहे. तसेच न्यायालयाने त्या दोघांना एक हजार रुपयांचा दंडही बजावला आहे.

आज शिवडीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी सुरू असताना नवनीत राणा यांच्या वडिलांच्या नावाचा पुकारा करण्यात आला. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही त्यांना अद्याप अटक झालेली नाही आणि ते कोर्टात हजरही झाले नाहीत. आता हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या निवासस्थानी न्यायालयाची नोटीस लावण्यात येणार आहे. यामुळे कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे. आता कोर्टात पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार आहे.

नेमके प्रकरण काय?

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणांच्या निवडीला आव्हान देत २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. उच्च न्यायालयाने जून २०२१ मध्ये नवनीत राणा यांना त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध मार्गाने मिळवल्याचा ठपका ठेवत जात प्रमाणपत्र सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना दोन लाखांचा दंडही बजावला होता. उच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २२ जून २०२१ मध्ये स्थगिती दिली होती.