पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात ८६ टक्के मतदान 

मुंबई ,​३०​ जानेवारी  / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के,
औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले.भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही श्री.देशपांडे यांनी दिली.

शिवसेनेचे नेते माजी खा.चंद्रकांत खैरे व  आमदार सतीश चव्हाण यांनी घेतला  मतदानाचा आढावा 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीसाठी आज मतदान झाले. शिक्षक मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.
औरंगाबाद येथील कृषी विद्यालयातील मतदान केंद्रावर शिवसेनेचे नेते माजी खा.चंद्रकांत खैरे, आमदार सतीश चव्हाण यांनी भेट देऊन झालेल्या मतदानाचा आढावा घेतला. याप्रसंगी माजी आ.किशनचंदजी तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, शिवसेनेचे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, सिनेट सदस्य दत्ता भांगे आदींची उपस्थिती होती.