वैजापूर शहरात भरदिवसा घरफोडी ; रोख रक्कम व दागिने असा साडे चार लाखांचा माल लंपास

वैजापूर ,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील बन्सीलालनगर भागात आज भर दुपारी घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने या भागात राहणारे विक्रम सदाशिव कदम यांचे घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 43 हजार रुपयांचा माल लंपास केला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील बन्सीलाल नगर येथील रहिवाशी विक्रम सदाशिव कदम (वय 44 वर्ष) हे सोमवारी (ता.23) दुपारी घराला कुलूप लावून येवला तालुक्यात आपल्या गावी गेले होते. जातांना घराची चावी मुलगा ओम याच्याकडे दिली होती. काही कामानिमित्त ओम शहरात गेला असता घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दरवाज्याचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला.थोड्याच वेळात काम आटोपून ओम हा घरी परत आला असता त्याला घराचा गेट व दरवाजा उघडा दिसला.आत जाऊन त्याने आई म्हणून हाक दिली असता घरात असलेल्या चोरट्याने त्याच्यावर हल्ला केला व बाहेर पळून गेला. गडबडलेल्या ओमने आपल्या मित्राला आवाज दिला घडलेली घटना सांगितली.ओम व त्याच्या मित्राने चोरट्याचा पाठलाग केला परंतु चोरटा हा त्याच्या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून पळून गेला.वडील परत आल्यावर घडलेली घटना ओमने आपल्या वडिलांना सांगितली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवडे, गणेश पैठणकर, योगेश झाल्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणी विक्रम सदाशिव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.