समुदाय, रोगप्रतिकारक शक्ती आणि ऐक्यासाठी योग उत्तम : पंतप्रधान

‘मन की बात 2.0’ च्या 12 व्या भागाद्वारे पंतप्रधानांनी साधला संवाद

आपल्या देशात कोरोना विरुद्धचा लढा सामुहिक प्रयत्नांमधून उभारला जात आहे : पंतप्रधान

सेवा आणि त्यागाची कल्पना हे केवळ आपले आदर्श नाहीत तर जीवन जगण्याचा मार्ग आहेत हे लोकांनी सिद्ध केले : पंतप्रधान

नवी दिल्ली, 31 मे 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात 2.0’ च्या 12 व्या भागाद्वारे देशाला संबोधित करताना सांगितले की, सामुहिक प्रयत्नांमधून देशात कोरोना विरुद्धचा लढा उभारला जात आहे. अर्थव्यवस्थेचा एक खूप मोठा हिस्सा सुरु होत असला तरीदेखील कोविड महामारीच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी अधिक सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान म्हणाले की, श्रमिक विशेष गाड्या आणि विशेष गाड्यांमध्ये सावधगिरीच्या सर्व उपाययोजनांचे पालन करत रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाली आहे. ते पुढे म्हणाले की, विमान सेवा पुन्हा सुरु झाली आहे आणि उद्योग देखील आपल्या सामान्य परिस्थितीत येत आहेत.  कोणीही निष्काळजीपणा करू नये असा इशारा देत त्यांनी लोकांना 6 फुट अंतर, चेहऱ्याला मास्क लावणे आणि शक्यतो घरीच राहायला सांगितले आहे. त्यांनी जोर देऊन सांगितले की, बऱ्याच कष्टानंतर देशाने ज्या पद्धतीने परिस्थिती सांभाळली आहे ती व्यर्थ होता कामा नये.

पंतप्रधानांनी लोकांनी दर्शविलेल्या सेवा भावनेचे कौतुक केले आणि हेच आपले सर्वात मोठे सामर्थ्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सेवा परमो धर्मः हे तर आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे, सेवा म्हणजेच आनंद, सेवेमध्येच समाधान आहे. देशभरातील वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांबद्दल मनापासून विनम्रता व्यक्त करताना पंतप्रधानांनी देशातील डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कामगार, पोलिस कर्मचारी आणि प्रसार माध्यमातील व्यक्ती यांच्या सेवाभावनेचे कौतुक केले. या संकटाच्या काळात महिला बचत गटांद्वारे केल्या जाणाऱ्या उल्लेखनीय कामाचे देखील त्यांनी कौतुक केले.

त्यांनी यावेळी तामिळनाडूचे के.सी. मोहन, अगरतळाचे गौतम दास, पठाणकोट येथील दिव्यांग राजू अशा सर्वसामान्य देशवासीयांची उदाहरणे दिली; ज्यांनी त्यांच्याकडील मर्यादित स्रोतांमधून या संकटाच्या काळात इतरांना मदत केली. देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला बचत गटाच्या जिद्दीच्या अनेक कथा समोर येत आहेत, असेही ते म्हणाले.

या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने अतिशय सक्रिय भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. त्यांनी नाशिकच्या राजेंद्र यादव यांचे उदाहरण दिले ज्यांनी आपल्या ट्रॅक्टरला एक उपकरण बसवून स्वच्छता यंत्र तयार केले. अनेक दुकानदारांनी ‘6 फुटाच्या नियमा’ चे पालन करण्यासाठी त्यांच्या दुकानात मोठे पाईप बसविले आहेत.

साथीच्या आजारामुळे लोकांना होणारा त्रास आणि अडचणींबद्दल आपली वेदना मांडताना पंतप्रधान म्हणाले, कोरोना विषाणूमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त आहेत पण वंचित मजूर व कामगार सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. पंतप्रधान म्हणाले की, त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार, प्रत्येक विभाग आणि संस्था एकत्रित येऊन वेगाने काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, ते कुठच्या परिस्थितीतून जात आहे याची संपूर्ण देशाला जाणीव आहे आणि केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनातील प्रत्येक जन त्यांच्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. रेल्वे आणि बसमध्ये लाखो मजुरांची सुरक्षितपणे वाहतूक करण्यात, त्यांच्या खाण्याची काळजी घेण्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात निरंतर प्रयत्न करत असलेल्या लोकांचे त्यांनी कौतुक केले.

नवीन उपाययोजना शोधणे ही काळजी गरज असल्याचे अधोरेखित केले. सरकार त्यादिशेने अनेक पावले उचलत आहेत असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे गावांमध्ये रोजगार, स्वयंरोजगार, लघु उद्योगांशी संबंधित मोठ्या शक्यताही निर्माण झाल्या आहेत. या दशकात आत्मनिर्भर भारत अभियान देशाला अधिकाधिक उंचावर नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी पुन्हा सांगितले की सध्याच्या कोरोना साथीच्या काळात सर्वत्र लोकांना योग आणि आयुर्वेदाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे आणि ते जीवनशैली म्हणून स्वीकारण्याची इच्छा आहे. त्यांनी “समुदाय, रोगप्रतिकारक शक्ती आणि ऐक्यासाठी” योग उत्तम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात ‘योग’ यासाठी देखील अधिक महत्वाचे आहे, कारण हा विषाणू आपल्या श्वसन प्रणालीवर सर्वाधिक परिणाम करतो. ‘योग’ मध्ये प्राणायामचे असे अनेक प्रकार आहेत जे आपली श्वसन प्रणाली मजबूत  करतात ज्याचा परिणाम दीर्घकालीन राहतो.

शिवाय आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘माय लाइफ, माय योग’ या आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ब्लॉग स्पर्धेसाठी लोकांनी आपले व्हिडिओ सामायिक करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान मोदींनी सर्वांना या या स्पर्धेत भाग घेऊन या नवीन मार्गाने आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी होण्याची विनंती केली.

पंतप्रधानांनी या महामारीचा सामना करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ‘आयुष्मान भारत’ योजनेतील लाभार्थींनी एक कोटीचा आकडा ओलांडल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी आयुष्मान भारतचे लाभार्थी तसेच साथीच्या आजारात रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की, एकीकडे आपण कोरोना विषाणूशी लढत आहोत तर दुसरीकडे अम्फान चक्रीवादळासारख्या आपत्तीचा देखील सामना करता आहोत. या अम्फान चक्रीवादळात पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या जनतेने ज्या धैर्याने आणि निर्भयतेने परिस्थितीचा सामना केला आहे त्याचे त्यांनी कौतुक केले. या राज्यातील शेतकऱ्यांनी या परिस्थितीचा ज्या धीराने सामना केला त्याबद्दल आणि त्यांनी दाखवलेल्या दृढनिश्चयाचे कौतुक करत त्यांना झालेल्या नुकसानाबद्दल पंतप्रधानांनी सहानुभूती व्यक्त केली.

मोदी म्हणाले की, चक्रीवादळाच्या आपत्ती व्यतिरिक्त देशातील बऱ्याच भागात टोळधाडीचे देखील संकट आले आहे. देशातील सामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तूंच्या कमतरता भासू नये म्हणून सरकार या संकटाच्या काळात कसे कठोर परिश्रम करीत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. केंद्र व राज्य सरकारे, कृषी विभाग किंवा प्रशासन आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येकजण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्‍यांना मदत करून या संकटामुळे पिकांचे नुकसान कमी करण्याच्या प्रयत्नांत आहे.

सध्याच्या पिढीला पाणी वाचवणे ही त्यांची जबाबदारी आहे हे पटवून देण्याची गरज आहे असे ते म्हणाले. पावसाचे पाणी वाचवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आणि ते म्हणाले की, जलसंधारणासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. या ‘पर्यावरण दिनाच्या’ दिवशी काही झाडे लावून निसर्गाची सेवा करण्यासाठी एखादा असा संकल्प करा ज्यामुळे तुमचे निसर्गाशी दैनंदिन नाते जपले जाईल अशी विनंती त्यांनी देशवासियांना केली. ते म्हणाले की लॉकडाउनमुळे आपल्या आयुष्याची गती थोडी कमी झाली आहे परंतु यामुळे आपल्याला निसर्गाकडे पाहण्याची संधी मिळाली आहे आणि वन्य प्राणी मुक्तपणे संचार करत आहेत.

निष्काळजीपणा आणि उदासीनता हा पर्याय असू शकत नाही असे सांगत पंतप्रधानांनी आपले भाषण संपविले. कोरोना विरुद्धचा लढा अजूनही तितकाच गंभीर आहे.

* * *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *