सहकार प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य वसंतराव शिरडकर यांचे निधन

औरंगाबाद,२२ जानेवारी / प्रतिनिधी :-सहकार प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य वसंतराव शिरडकर  यांचे ८९व्या वर्षी वृद्धापकाळाने येथे शनिवारी निधन झाले.

वयाच्या दुसऱ्या वर्षीच पितृछत्र हरवले, अत्यंत बिकट कष्टाने बीए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर शिक्षक म्हणून नोकरी केली. तरूण वयात समाजवादी विचारसरणी व श्री धनंजयराव गाडगीळ यांच्या सहकारी चळवळीच्या ओढीने त्यांनी सरकारी नोकरी सोडुन सहकार क्षेत्रात लोअर डिप्लोमा व हायर डिप्लोमा इन कोॲापरेशन मध्ये अनेक विद्यार्थी घडवले. जिल्हा सहकारी बोर्ड व सहकार प्रशिक्षण केंद्रातील उस्मानाबाद ,नांदेड,परभणी,लातूर, औरंगाबाद , अहमदनगर ,अमरावती व पुणे येथे तीस वर्षाहून अधिक  सेवा केली. 

श्री वसंतराव शिरडकर हे स्वामी वरदानंद भारती यांचे शिष्य होते. त्यांनी  येथे दासगणू  परिवार रूजवून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. स्वामी वरदानंद भारती यांनी स्थापलेल्या संत विद्या प्रबोधिनीचे ते विश्वस्त होते. दासगणू परिवाराच्या गोरटे, उत्तरकाशी व भारत भरात होणाऱ्या अनेक शिबीर व कार्यक्रमांध्ये त्यांनी तन मन धनाने सहभाग घेतला.

शिरड शहापूर सारख्या खेड्यातुन जीवनाची सुरूवात , शिक्षणावर प्रेम व वाचनाची आवड यावरून त्यांनी स्वतः अनेक कष्ट करून स्वतःच्या चारही मुलांसोबत शिरड येथील अनेक मुलांना उत्तम शिक्षण दिले. 

अॅग्रीकल्चर ट्रेनिंग ॲंड मॅनेजमेंट चे निवृत्त संचालक कै. सतीश शिरडकर , अस्थीरोग तज्ञ कै. डॅा संजय शिरडकर , उद्योजक श्री सुधीर शिरडकर व उर्जा व पर्यावरण सल्लागार श्री जयंत शिरडकर यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमीला , मुले सुधीर व जयंत, सुना डॅा स्वाती , सौ मनीषा , नातवंडे, पतवंडे मोठा परिवार आहे.