शिवसेनेच्या नेतृत्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश-फडणवीसांचा घणाघाती आरोप

औरंगाबाद ,२३ मे /प्रतिनिधी :-  शिवसेनेच्या नेतृत्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश झालाय आणि त्याची फळं आता इथली लोक भोगत आहेत, अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून यासाठी सरकारला धारेवर धरण्यासाठी भाजपच्या वतीने आज जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

सर्व छायचित्रे -चंद्रकांत थोटे

या जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री अतुल सावेजी, गिरीश महाजन, विजयाताई रहाटकर, प्रशांत बंब, नारायण कुचे, संजय केणेकर आणि इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

May be an image of 8 people, child, people sitting, people standing and outdoors
छायचित्रे -चंद्रकांत थोटे

औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गंभीर बनला आहे. महापालिकेला नियोजन न जमल्याने औरंगाबादकरांना आठ दिवसांआड पाणी मिळत आहे. महापालिका पाणीप्रश्न हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादकडे दुर्लक्ष केले आहे. या दोन्ही यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपच्या वतीने आज महापालिकेवर जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सतत इतके वर्ष सातत्याने महानगर पालिकेची सत्ता गाजवूनही संभाजीनगरात पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या नेतृत्त्वात झालाय, त्याची फळं संभाजीनगरची लोक भोगत आहेत. इथे पाणीच नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागतोय. मी मुख्यमंत्री असताना जी योजना मंजूर केली आणि १६०० कोटी रुपये दिले. त्या योजनेत बदल करुन ६०० कोटी महापालिकेने द्यावे, असा निर्णय या सरकारने केला. इथे महापालिकेकडे पगार द्यायला पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे”, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

May be an image of 14 people, people standing and text that says "भव्य जलआक्रोश मोर्चा भारतीय जनता पार्टी, संभाजीनगर"

“केंद्र सरकारने दिलेले पैसेच या योजनेत वळवले आहेत. योजनेचा ठेकेदार कामही करत नाही. अर्धा किलोमीटरही काम झालेलं नाही. ४० किलोमीटर काम करायचं आहे. ज्या वेगाने काम चाललंय त्या वेगाने २५ वर्ष लागतील, त्यामुळे भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढत आहोत, प्रचंड प्रतिसाद त्याला आहे, पाण्याची समस्या सुटेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहणार”, असंही त्यांनी सांगितलं.

Image
सर्व छायचित्रे -चंद्रकांत थोटे

“नाना पटोले हे रोज खोटं बोलतात. मनाला येईल ते बोलतात त्यामुळे अशा व्यक्तीला उत्तर देण्याचं कारण नाही. २४/७ पाणी पुरवठ्याचा अवॉर्ड नागपूरला मिळालाय. हे नाना पटोलेंना माहिती नाहीये”, असं म्हणत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका केली.

सर्व छायचित्रे -चंद्रकांत थोटे
Image

‘झुकेगा नही’ म्हणणाऱ्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या 80 वर्षाच्या आजीच्या घरी कधी जाणार?

‘झुकेगा नही’ असं म्हणणाऱ्या 80 वर्षाच्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले, पण पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या 80 वर्षाच्या आजीच्या घरी मुख्यमंत्री कधी जाणार असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना स्वस्थ झोपू देणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

सर्व छायचित्रे -चंद्रकांत थोटे

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या 25 वर्षाच्या काळात शिवसेनेने औरंगाबादच्या पाण्याचा सत्यानाश केला. महापालिकेकडे एकही पैसा उरला नाही. आता जे काही चाललंय ते केवळ केंद्र सरकारच्या पैशावर सुरू आहे. महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. संभाजीनगरमध्ये जे काही झालं ते आमच्या काळात झालं. आताचं सरकार हे पाण्याचं शत्रू आहे.”

May be an image of 1 person and standing

देवेंद्र फडणवीस यांनी  मांडलेले प्रमुख मुद्दे असे :

  • आजची लढाई ही सत्ता परिवर्तनाची नाही, तर व्यवस्था परिवर्तनाची आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वातील भ्रष्ट कारभार संपविण्यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत. हा भाजपाचा मोर्चा नाही, तर संभाजीनगरच्या जनतेचा मोर्चा आहे.
  • मुख्यमंत्र्यांना कोणत्याच समस्येशी काही लेनदेन नाही.ते म्हणतील, मी म्हणतो म्हणून…
  • औरंगाबादला संभाजीनगर समजा दगडाला सोन्याची नाणी समजा,पाईपला नळ समजा आणि नळातून येणार्‍या हवेला पाणी समजा!
  • तुम्ही माझ्या सभेचे पोस्टर्स फाडू शकाल,पण जनतेचा आक्रोश तुम्ही मिटवू शकत नाही.
  • आम्ही जेव्हा पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली, तेव्हा महापालिकेने 1 रुपया द्यावा, बाकी पूर्ण निधी राज्य सरकार देईल, असा निर्णय घेतला.आता सरकार बदलले आणि 600 कोटी महापालिकेला द्यायला सांगितले.
  • आताच्या राज्यकर्त्यांना संभाजीनगरशी काहीच लेनदेन नाही.मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ हे महाराष्ट्राच्या नकाशावर आहे, हेच त्यांना ठावूक नाही.
  • वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारने पाडला.वॉटरग्रीडचा मुडदा पाडला.समुद्रातून वाहून जाणारे पाणी वाचविण्याच्या योजनेला स्थगिती दिली.जलयुक्त शिवार योजना बंद केली.हे महाविकास आघाडी सरकार म्हणजे पाण्याची शत्रू आहे.