माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावे ही प्रत्येक आईची इच्छा:डॉ.चारुलता रोजेकर- देशमुख

गर्भसंस्कार-एक नवीन पाऊल’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

औरंगाबाद,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- आई ही आईच असते. ती श्रीमंत असो किंवा गरीब…आई ती आईच असते…आणि प्रत्येक आईला असेच वाटते की माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावं आणि माझा नऊ महिन्यांचा गरोदरपणा आनंददायी व्हावा. यासाठी प्रत्येक मातेने गरोदरपणात योगा आणि प्राणायाम करण्याचे आवाहन डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख यांनी केले.

          जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे मार्गदर्शन असणारा आणि लोहमार्ग पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव अशा ‘गर्भसंस्कार- एक नवीन पाऊल’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या युट्युब आणि फेसबुक पेजवरुन  थेट प्रसारण करण्यात आले. या उपक्रमाच्या पहिल्या भागाला दर्शकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. ‘गर्भवती महिलांमधील शारीरिक व मानसिक समस्या’ या विषयावर डॉ. रोजेकर यांच्या पहिल्या व्याख्यानाने या उपक्रमाची सुरूवात झाली.  यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि लोहमार्ग पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा दुसरा भाग उद्या दुपारी 2 वाजता थेट स्वरुपात प्रसारित होणार आहे. यासाठी दर्शकांनी https://youtu.be/uPM8KkyPKCs लिंकवर क्लिक करावे किंवा DMAurangabadMH या युट्युब चॅनलला भेट द्यावी.

          मार्गदर्शन करताना डॉ. रोजेकर म्हणाल्या की,  गर्भारपणात प्रत्येक स्त्रीने स्वत:ची व होणाऱ्या बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पौष्टिक आहार आणि नियमित योगा करणे गरजेचं आहे. गर्भारपणामधील शिक्षण म्हणजे गर्भसंस्कार होय. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईने स्वत:बद्दल अभिमान बाळगणे. गर्भारपण म्हणजे आजारपण असे न समजता गर्भारपणाचा आनंद व्यक्त करता आला पाहिजे.  होणारे बाळ ते मुलगा किंवा मुलगी असो त्याचे आनंदाने स्वागत करायला पाहिजे. सुलभ प्रसुती होण्यासाठी श्वासावरती नियंत्रण असणे खूप महत्वाचे आहे. हे नियंत्रण मिळविण्यासाठी गर्भारपणातील प्राणायाम खूप महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

          जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, गरोदर माता आणि बालकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स गरोदर मातांना सातत्याने मार्गदर्शन करतात.  गरोदर मातांनी काय काळजी घ्यावी, काय करावे , काय करु नये याची अधिकृत माहिती त्यांना व्हावी यासाठी हा अभिनव उपक्रम  सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार असून  सर्व गरोदर मातांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देखील पाण्डेय यांनी केले.

          लोहमार्ग पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महिलेच्या उदरात बाळाच्या रुपात एक पिढी जन्म घेणार असते या पिढीसाठी आपले आणि आपल्या कुटुंबाचे काय उत्तरदायित्व असले पाहिजे याविषयी तसेच इतर आरोग्याच्या दृष्टीने शास्त्रोक्त पध्दतीचे मार्गदर्शन आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. ऑनलाईन पध्दतीने हे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांना देखील याचा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन कोमल औताडे यांनी केले.